प्रतीकात्मक छायाचित्र Pudhari Photo
मुंबई

Lawrence Bishnoi Reels Trap | लॉरेन्स बिश्नोई गँगने रचला 'रील्स'चा सापळा! तरुणांना टोळीत सामील करण्यासाठी नवा फंडा!

Lawrence Bishnoi Reels Trap | सोशल मीडियाचा शस्त्रासारखा वापर; पोलीसही चक्रावले, कॅनडात सेटल करण्‍याचे दाखवले जातेय स्वप्न!

पुढारी वृत्तसेवा

लॉरेन्स बिश्नोई टोळी तरुणांना गुन्हेगारी जगताकडे आकर्षित करण्यासाठी इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर अगदी विचारपूर्वक करत आहे. ही टोळी स्वतःचे 'फॅन अकाउंट्स' चालवते.

Lawrence Bishnoi Reels Trap

मुंबई : सोशल मीडियावरील रील्समधील खोटा रुबाब आणि ग्लॅमरला तरुणाई बळी पडतेच. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे ग्लॅमरस आयुष्य आपल्यालाही जगता येईल, अशा तरुणांच्या मानसिकतेचा फायदा घेत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांना आपल्या टोळीत सामील करण्यासाठी चक्क सोशल मीडियावरील रील्सचा सापळा रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक केलेले सात आरोपी साधारण २० ते ३० वयोगटातील तरुण आहेत. हे सर्वजण उत्तर भारतातील असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडे आकर्षित झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार शुभम लोणकर

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर या महिन्याच्या सुरुवातीला गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या 'स्पेशल टास्क फोर्स' (STF) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत आरोपींना अटक केली आहे. या गोळीबाराचा सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

संशयित फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शुभम लोणकर टोळीच्या संपर्कात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यांचे अनेक 'फॅन पेजेस' आहेत. या पेजवरून टोळीतील म्होरक्यांचे व्हिडीओ (Reels) शेअर केले जातात. या व्हिडिओंमध्ये गुन्हेगारांना 'स्टाईल' किंवा 'स्वॅग'मध्ये दाखवले जाते. विशेष म्हणजे, काही व्हिडीओ तर थेट न्यायालयाच्या परिसरातून शूट करून अपलोड केलेले आहेत, जे तरुणांना आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. चौकशीत आरोपींनी सांगितले की, ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शुभम लोणकर टोळीच्या संपर्कात आले. सोशल मीडियावरील लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ग्लॅमरस रील्स पाहून आपणही असेच दिमाखदार आयुष्य जगू, या मोहापायी ते थेट गुन्हेगारी टोळीत सामील झाले.

सोशल मीडियाचा उघडपणे शस्त्रासारखा वापर

जुन्या काळातील मुंबईचे अंडरवर्ल्ड (गँगस्टर) अतिशय गुप्तपणे आणि लपून-छपून काम करायचे; पण लॉरेन्स बिश्नोई टोळी मात्र याच्या अगदी उलट आहे; ते फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा उघडपणे वापर करतात. ही टोळी साध्या 'फॅन पेजेस'पासून ते थेट मेसेज करण्यापर्यंत सोशल मीडियाचा वापर करून तरुणांपर्यंत पोहोचत असल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

कोणते रील्स केले जातात व्हायरल ?

लॉरेन्स बिश्नोई टोळी तरुणांना गुन्हेगारी जगताकडे आकर्षित करण्यासाठी इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर अगदी विचारपूर्वक करत आहे. ही टोळी स्वतःचे 'फॅन अकाउंट्स' चालवते. यामध्ये तरुण मुले हातात एके-४७ रायफल घेऊन फोटो काढतात किंवा लॉरेन्स बिश्नोईचे न्यायालयातील व्हिडीओ 'स्टाईल'मध्ये (उदा. भगतसिंगांचे फोटो असलेले टी-शर्ट घालून) पोस्ट केले जातात. जेव्हा एखादी टोळी हल्ला किंवा हत्या करते, तेव्हा त्याची जबाबदारी सर्वात आधी याच सोशल मीडिया अकाउंट्सवरून घेतली जाते.

पोस्टना हजारो लाईक्स, तरुण थेट करतात मेसेज

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून केल्या जाणाऱ्या पोस्टना हजारो लाईक्स मिळतात. यातूनच टोळीला नवीन मुले शोधणे सोपे झाले आहे. अनेक तरुण या पोस्ट पाहून इतके प्रभावित होतात की, ते स्वतःहून या टोळीला 'आम्हाला तुमच्यासाठी काम करायचे आहे' असे मेसेज पाठवतात. सोशल मीडियावरून ग्लॅमरस रील्स करत गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत ही टोळी नवीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढत आहे.

कॅनडात सेटल होण्याचे दाखवले जातेय स्वप्न

बिश्नोई टोळी प्रामुख्याने गरीब किंवा कौटुंबिक समस्या असलेल्या तरुणांना टार्गेट करत आहे. या तरुणांना "भारतात गुन्हा केल्यानंतर कॅनडाला पाठवून तिथे नवीन आणि चांगले जीवन देऊ" असे आमिष दाखवले जात आहे. इंस्टाग्रामवरील झगमगाटी व्हिडीओ (Reels) पाहून या तरुणांना वाटते की गुन्हेगारीच्या जगात खूप नाव आणि पैसा आहे. आपणही मोठे 'डॉन' होऊ शकतो, या भ्रमात ते काहीही करायला तयार होतात. सोशल मीडियाचा वापर करत बिश्नोई टोळीने केलेले गुन्हेगारीचे उदात्तीकरण रोखण्याचे मोठे आव्हान आता मुंबईसह उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांसमोर आहे.

टोळीशी संबंधित ६,००० हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स बंद

ऑक्टोबर २०२३ मध्ये पंजाब पोलिसांनी केंद्र सरकार आणि इतर सुरक्षा यंत्रणांना कळवले की, त्यांनी बिश्नोई टोळीशी संबंधित ६,००० हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स बंद (Block) केली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई पोलीस सुद्धा अशा अकाउंट्सवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि ती सातत्याने बंद करत आहेत.

सोशल मीडियावरील कारवाईत येणारे अडथळे

पोलिसांनी स्पष्ट केले की, ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सवर सतत कारवाई करून ती बंद करतात. मात्र, एक अकाउंट बंद केले की गुन्हेगार लगेच दुसरे नवीन अकाउंट तयार करतात. त्यामुळे ही सर्व अकाउंट्स कायमची बंद करणे कठीण जात आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या (STF) चौकशीत आरोपींनी कबूल केले की, सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडीओ पाहून ते या टोळीकडे आकर्षित झाले होते. त्यांना टोळीसाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली होती. जेव्हा या तरुणांच्या संपर्कात त्यांच्याच गावातील एखादी व्यक्ती आली (जी आधीच या टोळीशी जोडलेली होती), तेव्हा त्यांना गुन्‍हेगारी जगता शिरकाव करण्‍याची 'संधी' मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT