

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये आज (दि.२६) पहाटे चकमक झाली. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा (Lawrence Bishnoi gang) गुंड जितेंद्र उर्फ जितू ठार झाला आहे. नोएडा पोलिसांच्या विशेष कृती दल (एसटीएफ) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. गाझियाबाद पोलिसांनी जितेंद्रवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मागील दाेन वर्षांपासून फरार असलेल्या जितेंद्रने मेरठच्या मुंडली पोलीस स्टेशन परिसरात आश्रय घेतला असल्याची माहिती 'एसटीएफ'ला मिळाली. आज पहाटे एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांनी परिसराला घेरले. जितेंद्रला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले; पण त्याने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जितेंद्र उर्फ जीतू हा हरियाणातील झज्जरमधील असोंडा सिवान गावचा रहिवासी होता. त्याच्याविरुद्ध गंभीर आठ गुन्हे दाखल होते. दुहेरी हत्याकांड प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२३ मध्ये तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला. मात्र त्यानंतर तो फरार होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. २०२३ मध्ये थाना टीला मोडजवळ झालेल्या एका खून प्रकरणात जितेंद्र हवा असल्याने गाझियाबाद पोलिसांनी त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.