

मुंबई : मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातून पाच शूटरर्संना अटक केली असून या आरोपींपैकी एक आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचा पोलिस तपासात खुलासा झाला आहे. या पाच आरोपींकडून पोलिसांनी सात बंदूक आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अभिनेता सलमान खानच्या जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या घरावर गोळीबार केल्यापासून बिश्नोई गँग देशभरात चर्चेत आहे. आता या शुटर्सपैकी एकाचे कनेक्शन बिश्नोई टोळीशी असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
या शुटर्सचे टार्गेट मुंबईतील एक बडा व्यापारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा व्यापारी कोण व खंडणीसाठी की त्याची हत्या करण्यासाठी त्याचे नाव या शूटर्सकडे आले होते याचाही तपास आता पोलिस करत आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या पैकी एक आरोपी विकास ठाकूरने चौकशीदरम्यान खुलासा केला आहे की तो बिश्नोई गॅंगच्या संपर्कात होता. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या आदेशानंतर हे पाच शूटर्स मुंबईत आले होते का? याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबईत त्यांना एक मोठं कॉन्ट्रॅक्टदेखील भेटलं होतं. अशी माहितीही तपासादरम्यान समोर आली आहे. मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर कोणावर हल्ला करायचा आहे. त्या संदर्भात माहिती बिश्नोई गँगकडून भेटणार होती. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर या पाच जणांना 50 लाख रुपये देण्याचे आश्वासनदेखील दिले गेले होते. मात्र या व्यापाऱ्याची सुपारी त्यांना कोणी दिली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यांचा प्लॅन सस्केस होण्याआधीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांची प्रसिद्ध गायक सिध्दू मुसेवाला याच्याप्रमाणे हत्या घडवून आणली जाईल, अशा आशयाचे पत्र जून २०२२ मध्ये सलमानच्या घराजवळ सापडले होते. त्यानंतर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीच्या शूटर्संनी गोळीबार केला होता. सध्या तिहार जेलमधून गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई गँग चालवत असतो. तसेच कॅनडामधून त्याच्या गँग चालवली जाते.