BMC Election 2026 Navnath Ban Controversy: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मानखुर्द भागातील प्रभाग क्रमांक १३५ मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजप उमेदवार नवनाथ बन यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार लालू भाई वर्मा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्यावर प्रचंड दबाव टाकला जात असून, जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा वर्मा यांनी केला आहे.
मानखुर्दच्या प्रभाग १३५ मध्ये भाजपचे नवनाथ बन आणि अपक्ष लालू भाई वर्मा यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत लालू भाई वर्मा यांनी अपक्ष लढून दुसरे स्थान पटकावले होते, त्यामुळे त्यांची ताकद मोठी मानली जाते. समोर आलेला एक व्हिडिओ आणि लालू भाई वर्मा यांच्या दाव्यानुसार, भाजप नेते किरीट सोमैया, मनोज कोटक आणि अमित साटम यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी रात्री उशिरा बोलावून घेतले होते.
लालू भाई वर्मा यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "रात्री १२ वाजता मला उचलून नेण्यात आले. पोलीस कमिशनर, जॉइंट सीपी आणि डीसीपी यांचे नाव घेऊन मला धमकावले जात आहे. माझ्या घराचा दरवाजा रात्रभर वाजवला जात होता. जर मी उमेदवारी मागे घेतली नाही, तर माझ्या गाडीत चरस, गांजा किंवा अफू ठेवून मला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे," असा खळबळजनक आरोप वर्मा यांनी केला आहे.
व्हिडिओमध्ये लालू भाई वर्मा कमालीचे संतप्त दिसत असून ते नवनाथ बन यांना उद्देशून म्हणत आहेत की, "तुम्ही मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन आमचा मर्डर करवा. माझ्या मुलाबाळांना संपवा, यापेक्षा जास्त काय कराल? किरीट सोमैया यांनी मला मुंबईत राहू देणार नाही आणि धंदा करू देणार नाही, अशी धमकी दिली आहे." हे सर्व 'सीएम'च्या सांगण्यावरून होत असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
या प्रकरणामुळे मुंबईतील निवडणुकीत साम-दाम-दंड-भेदाचा वापर होत असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप या आरोपांवर भाजपच्या अधिकृत नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र या घटनेमुळे मानखुर्दमध्ये तणावाचे वातावरण आहे.