

मुंबई : राजेश सावंत
वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये आपल्या कट्टर शिलेदारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कायदेशीर संकटमोचन आमदार अॅड. अनिल परब यांनी थेट ठाकरेंशी पंगा घेतला आहे. खुद्द उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी विनंती करूनही आपल्या शिरेदाराने अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे न घेता, परब यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये ठाकरेंचे कट्टर समर्थक बाळा सावंत, विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व विधानसभेत म्हणजेच ठाकरेंच्या अंगणात सक्षम उमेदवारच नव्हता. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरूण सरदेसाई उभे राहिले आणि भाजपा-शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व झुगारून जिंकलेदेखील. आता या विजयात मेहनत घेणाऱ्यांना महापालिकेची उमेदवारी मिळावी म्हणून सरदेसाईंनी आग्रह धरला. त्यावरून आमदार अनिल परब यांच्याशी त्यांचे वाजले.
सरदेसाई व परब यांच्यामधील मतभेद सोडवण्यासाठी मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी समझोताही घडवला. पण प्रभाग क्रमांक ९५ मध्ये हरी शास्त्री यांनाच उमेदवारी मिळाली व सरदेसाईंची सरशी झाली. यात परब दुखावले गेले व या प्रभागात दावेदार असलेले चंद्रशेखर वायंगणकर नाराज झाले. परब यांच्या सांगण्यावरूनच वायंगणकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या आपल्या शिलेदाराला आपल्याच पक्षाच्या उमेदवारासमोर निवडून आणण्यासाठी अनिल परब सज्ज झाले आहेत.
ठाकरेंसोबत असलेले घरोब्याचे संबंध काही काळासाठी बाजूला ठेवून, ते या निवडणुकीत बंडखोराचा उघड प्रचार करणार आहेत. विजयी झाल्यानंतर या शिलेदाराला पुन्हा ठाकरेंच्या कळपातच घेऊन जाण्याचा निर्णयदेखल त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या लढाईकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.