डॉ. महेश केळुसकर
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची वेगळी ओळख आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला आणि वसंत ऋतूला सुरुवात होते. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला होळी पौर्णिमा असंही म्हणतात. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.
हो ळी उत्सवाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी वेगवेगळी नावं आहेत. कोकणात याला ‘शिमगो’ म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असंही याला म्हटलं जातं. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असं नाव दिलं आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा.
कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे 15 दिवस साजरा केला जातो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला भद्रेचा होम असं म्हणतात.
ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. यानंतर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात. चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. दापोलीतील आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटला जातो. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीतं म्हणतात.
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतकं राहणारे कोळी बांधव शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचं सामान, फळं, खाद्यपदार्थ सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळीबांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदोत्सव यावेळी साजरा केला जातो.
कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात गडकऱ्यांची होळी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारं हे गाव. स्वराज्यातील मावळे, जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत, ती परंपरा या गावानं जोपासली आहे. आगीतून पळणं , नारळ जिंकणं अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात जतीच्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे.
शिमगा उत्सवात नृत्याचं सादरीकरण हमखास केलं जातं. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचं मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
होळी साजरी करताना आदिवासीबांधव गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असलेलं भोजन करतात. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीदरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचं दिसतं. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केलं जातं. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पारंपरिक आणि विविध पद्धतीनं होळी साजरी केली जाते.
होळी सणानिमित्त महाराष्ट्रात पारंपरिक लोकगीतं आणि आधुनिक बीजे गाण्यांचा कहर असतो. होळीचा वाजतोय ढोल (आनंद शिंदे), गावांची होली लावाची हाय आणि रंग रंगतस खेळ पोरी खेळ... ही लोकप्रिय मराठी गाणी धुळवडीच्या उत्साहात रंगत आणतात. खेळताना रंग बाई होळीचा...
हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय आहे. ही गाणी राधा-कृष्ण, रंगांची उधळण आणि वसंत ऋतूचं वर्णन करतात. कोकण आणि ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीची होळीची गाणी गायली जातात. तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असलेली गाणी रंग खेळताना, नृत्य करताना आणि पारंपरिक होलिका दहन सोहळ्यात मोठ्या उत्साहानं वाजवली जातात. मराठी संस्कृतीमध्ये होळी हा सण लोकसंगीत आणि पारंपरिक गाण्यांनी नटलेला असतो. कोकणात होळीची गाणी गावाची पालखी आणि मांडवाच्या भोवती फिरतात. कोकणी लोकसंगीतात ‘शबय-शबय’चा जयघोष आणि डफावरची थाप देऊन देवाची गाणी गायली जातात.
चंदन रातीला आला शिमगा... यासारखी गाणी कोकणच्या लाल मातीतील उत्सवाचं वर्णन करतात.
ग्रामदैवताच्या पालखीसमोर पारंपरिक भजनं आणि नमन खेळे सादर केले जातात.
होळीचा वाजतोय ढोल हे सर्वात लोकप्रिय गाणं असून यात होळीच्या ढोलाचा ताल आणि आनंदाचं वर्णन आहे. रंग रंगतस खेळ पोरी खेळ... हे गाणं धुळवडीच्या रंगात न्हाऊन निघणाऱ्या तरुणींच्या उत्साहावर आधारित आहे. गावांची होली लावाची हाय... हे गीत गावातील सामूहिक होळी पेटवण्याच्या परंपरेवर भाष्य करतं. मराठी सिनेमांनीही होळीचे विविध पैलू विविध गाण्यांतून मांडले आहेत.
‘आली रे आली पंचमी आली’ हे सुशीला चित्रपटातील अशोक सराफ आणि रंजना यांच्यावर चित्रित केलेलं गाणं आजही जुन्या पिढीत लोकप्रिय आहे. ही नवरी असली... हे रोमँटिक गीत लग्नानंतरच्या पहिल्या होळीचं वर्णन करणारं आहे. होळीची गाणी ‘बुरा न मानो होली है’ ही भावना जोपासत समाजातील सर्व थरांना एकत्र आणतात. आपणही रंग खेळत, गाणी म्हणत ही ओळी आनंदानं साजरी करुया.