मुंबई

मुंबई : ‘लहान मुलांसाठी ‘खिलखीलहाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार’

अनुराधा कोरवी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर 'खिलखीलहाट' रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे आज 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रम सुरू झाला. यावेळी नागरिक श्रीमती पूनम नायर यांनी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत अशी तक्रार केली. त्यावर  पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. या वेळी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा, एन वॉर्डचे सहायक आयुक्त संजय सोनवणे, अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपायुक्त देविदास क्षीरसागर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, गुजरात शासनाने लहान मुलांसाठी 'खिलखीलहाट' ही रुग्णवाहिका योजना सुरू आहे. तरी याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसरात 'खिलखीलहाट' रुग्णवाहिका सुरू करणार आहे. यावेळी पालकमंत्री यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील समस्या जाणून घेवून त्यावर कार्यवाही करण्यात येइल. ज्या नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत त्यांच्या टोकन क्रमांकानुसार अर्ज निकाली काढू असे नागरिकांना त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी मेट्रो पूलाच्या खालील पार्किंग हटवणे, अनधिकृत दुकानांवर कारवाई करणे, नाल्यांचे खोलीकरण, म्हाडा, रस्ते दुरुस्ती, रस्ते रुंदीकरण, पाणी कमी दाबाने येणे, छत्रपती शिवाजी मैदान येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने केलेले खोदकाम पूर्ववत करून पार्क सुस्थितीत करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सभासदांना विश्वासात न घेता कार्यकारी मंडळाच्या मनमानी कारभार, ड्रेनेजमुळे निर्माण झालेल्या समस्यावर तोडगा काढणे यासह १७० विविध विषयांवर अर्ज आले होते. त्यापैकी १०२ अर्जदारांनी प्रत्यक्ष आपल्या तक्रारी मांडल्या होत्या. पालकमंत्री यांनी सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.

साऊथ वॉर्ड येथे उद्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला'

दि. ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबरपर्यंत 'पालकमंत्री आपल्या भेटीला' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी त्याच्या तक्रारीच्या अर्जासह 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.  शुक्रवारी (दि.७) रोजी आर साऊथ वॉर्ड येथे, शनिवारी (दि. ८) रोजी के ईस्ट वॉर्ड, सोमवारी (दि.१०) रोजी आर सेंट्रल वॉर्ड, बुधवारी ( दि. १२) रोजी एल वॉर्ड, गुरुवारी (दि. १३) रोजी एस वॉर्ड, शुक्रवारी (दि.१४) रोजी एम ईस्ट वॉर्ड, शनिवारी (दि.१५) रोजी एच वेस्ट वॉर्ड, सोमवारी ( दि.१७) रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे, बुधवारी (दि. १९) रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे, गुरुवारी (दि. २०) रोजी पी साऊथ वॉर्ड येथे, सोमवारी येथे (दि. ३१) रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे, बुधवारी ( दि. २/११/२०२२) रोजी के वेस्ट वॉर्ड येथे, गुरुवारी (दि. ३) रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे, शुक्रवारी ( दि.४ ) रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. नियोजित रोजी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम वरीलप्रमाणे सुरू होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT