वाशिम (अजय ढवळे ): वाशिम शहरातील हिंगोली रोडवरील मारूती सुझूकी शोरूममध्ये काम करणाऱ्या एका २० वर्षीय युवकाला विजेचा धक्का लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी (दि.५) घडली. सूरज राजू बरेटी (वय २० वर्षे, रा.गणेश पेठ, वाशीम) असं मृत युवकाचे नाव आहे.
वाशिम शहरातील हिंगोली रोडवरील मारोती सुझुकी शोरूम काल विजयादशमी सनानिमित्त बंद होते. त्यामुळे शोरूममध्ये काम करणाऱ्या काही कामगारांनी आपल्या स्वतःच्या मोटारसायकली सर्विसिंगसाठी आणल्या होत्या सुरज बरेटी यानेही आपली मोटरसायकल लावली. यानंतर अचानक त्याच्या हातातील पाण्याच्या पाईप मध्ये विद्युतप्रवाह आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शोरूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.
वाशीम शहरातील पुसद रोडवर असलेल्या उड्डाणपूलावर १५ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. ज्योती महादेव बनसोडे (रा. शेलु रोड वाशिम) असे तिचे नाव आहे.
वाशीम जिल्ह्यात ५ ऑक्टोबरच्या सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. वाशीम येथील ज्योती बनसोडे ही विद्यार्थिनी शिकवणी वर्गावरून आपल्या भावासोबत घरी जात होती. घरी जात असताना, रेल्वे उड्डाण पुलावर अचानक अंगावर वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमी मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. परंतु तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.