मुंबई : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आता या सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन, वर्षाला किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे लक्ष्य आणि १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवस निर्माण करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत नवीन नियमावली शासनाने जाहीर केली आहेत. (Gram Rojgar Sahayak Salary Hike)
मृद व जलसंधारण (रोहयो) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींबाबत पाठपुरावा केला होता.
सहा महिन्यांत ३ हजार मनुष्यदिवस नवीन निकषांनुसार प्रत्येक ग्राम रोजगार सहाय्यकाला वर्षभरात किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत किमान ३ हजार मनुष्यदिवस निर्मिती अपेक्षित आहे.
वर्षभरात १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवसांची निर्मिती करणाऱ्या सहाय्यकांना २ टक्के प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. त्यासोबत प्रवासभत्ता आणि डेटा पॅकची सुविधाही स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.
वर्षातील दोन महिन्यांच्या ‘पॉज कालावधीत’ जॉब कार्ड पडताळणी, ई-केवायसी आणि अन्य कार्यालयीन कामांसाठी दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
ग्राम रोजगार सहाय्यकाची निवड दरवर्षी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत केली जाईल. ही निवड १ सप्टेंबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी असेल आणि निवड प्रक्रियेवर ग्रामसभेचे नियंत्रण राहणार आहे.
नवीन निकष ३० जून २०२७ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर लागू राहतील. या कालावधीत कामगिरीचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमीच्या कामांची नोंद, जॉब कार्ड पडताळणी आणि रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेत ग्राम रोजगार सहाय्यकांची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे.