मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्ता भागात येणाऱ्या 750 मिलीमीटर व्यासाच्या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम मंगळवार दिनांक 10 मार्च ते बुधवार 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे.
यामुळे 24 तासांच्या कालावधीत ‘पी पूर्व’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग व आर्य भास्कर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री 12.00 ते मध्यरात्री 03.00) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
शिवशाही प्रकल्प (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ : रात्री 11.45 ते पहाटे 05.45) पाणीपुरवठा बंद राहील, तर श्रीकृष्ण नगर, इंदिरा गांधी संशोधन संस्था (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ : मध्यरात्री 03.30 ते सकाळी 09.00) पाणीपुरवठा बंद राहील.
सॅटेलाईट टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान, फिल्मसिटी मार्गालगतचा परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ : रात्री 12.00 ते मध्यरात्री नंतर 03.00) पाणीपुरवठा बंद राहील.