

मुंबई : ॲण्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकर फैजुल मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेयसीच्या चारित्र्याविषयी आक्षेपार्ह विधान करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
आत्महत्या केलेली तरुणी आई- वडिलांसह ॲण्टॉप हिल येथे राहात होती. रविवारी आई-वडील रात्री दहा वाजता घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यांना त्यांच्या मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला. तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. सहा पानांच्या या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या प्रियकर फैजुलविषयी लिहिले होते. तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. तो तिच्या चारित्र्यावर सतत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करत होता. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. नैराश्यातून तिने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार उघडकीस येताच वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रियकराला अटक केली आहे.