मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती, सूचना दाखल करण्यास आणि त्यानंतर अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता 20 डिसेंबरपूर्वी लागण्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाला राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाले आहेत.
अंतिम मतदार यादी आता 10 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरला जाहीर होईल. प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर होती. आधी ही मुदत 3 डिसेंबरपर्यंत आणि आता 15 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 14 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला लागेल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 22 डिसेंबर ऐवजी 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत निवडणुकांची लगबग सुरू झाली असून, पालिकेच्या निवडणूक विभागाने विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामांसाठीच्या नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी व अधिकारी वर्ग नियुक्ती केला जात आहे. महापालिका चिटणीस विभागातून 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य विभागातूनही 50 ते 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकांसह सर्वच महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल कधीही वाजूू शकतो.
मुंबईत शाळांचे वर्ग मतदान केंद्रांसाठी उपलब्ध व्हावेत म्हणून महापालिकेसह खासगी शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत.
काही मतदान केंद्रे मैदानात असल्यामुळे तेथे मंडप उभारण्यासह अन्य सुविधा उभारण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती महापालिकेने केली आहे.
महापालिकेच्या काही गाड्याही निवडणूक कामासाठी तैनात करण्यात आल्या असून काही गाड्या येत्या काही दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.
मुंबईतील एका प्रभागामध्ये किमान 40 ते 45 बूथ असून काही प्रभागात त्यापेक्षा जास्त बूथ असल्यामुळे प्रत्येक बूथसाठी बूथ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.