

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी बुधवार, दि. 10 डिसेंबररोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारुप मतदार यादीवरील सर्व 5 हजार 213 हरकतींची पडताळणी, स्थळपाहणी झाली आहे. महापालिका प्रशासनस्तरावर मतदार यादी दुरुस्तीची लगबग अंतिम टप्प्यात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर दि. 20 नोव्हेंबररोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली होती. या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी सुरुवातीला दि. 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. महापालिकांच्या प्रारूप मतदार यादीत अनेक चुका असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने राज्यभरातून पुढे आल्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हरकती दाखल करण्यासाठी दि. 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीत सांगली महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 5 हजार 213 हरकती दाखल झाल्या. मतदारांचे प्रभाग अदलाबदल झाल्याच्या तक्रारी प्रामुख्याने आहेत.
दरम्यान, दाखल हरकतींवरून स्थळपाहणी, पडताळणी झाली आहे. ज्या मतदारांची नावे अन्य प्रभागात समाविष्ट झाली आहेत, अशांची नावे पुन्हा मूळ प्रभागात ठेवण्यासाठी मतदार यादी दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. बुधवार, दि. 10 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदारयादीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.