

मुंबई : मुंबई शहरातील मतदारांची दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असली तरी मुंबईबाहेरील मतदारांच्या दुबार नावाचा प्रश्न जैसे थे आहे. ही नावे मुंबईत सापडलेल्या 4 लाख 33 हजार मतदारांपेक्षा दुप्पट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पूर्णपणे दुबार मतदान रोखणे शक्य नाही.
मुंबई शहर व उपनगरच्या मतदार यादीमध्ये 4 लाख 33 हजार मतदारांची दुबार व अनेक नावे आढळून आली आहेत. त्यामुळे अशा मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत काही नावे एकच असली तरी व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे आता मतदार यादीतील त्यांचा फोटो, पत्ता याची शहानिशा करून, दुबार व अनेक ठिकाणी नावे असलेल्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत दुबार मतदानाची शक्यता कमी होणार आहे.
मुंबईत मतदान करणाऱ्या अनेक मतदारांची मुंबईबाहेरील शहरांसह विविध राज्यांमधील मतदार यादीत नावे असल्याचे सांगण्यात येत आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार येथे मतदान करणाऱ्या बहुतांश मतदारांची नावे मुंबईच्या मतदार यादीतही आहेत. ही नावे नेमकी कोणती, हे केंद्रीय निवडणूक आयोगच सांगू शकणार आहे. मुंबई शहरातील मतदारांची दुबार नावे वगळली तरी अन्य शहर व राज्यातील मतदारांची दुबार नावे वगळणे शक्य नाही. अशी दुबार नावे 4 लाख 33 हजारपेक्षा दुप्पट असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुबार नावे येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी वगळणे शक्य नाही. त्यामुळे दुबार मतदानाचा धोका टळलेला नाही.
मतदानापासून रोखणे शक्य नाही !
मुंबईसह आजूबाजूच्या शहरांमध्ये एकाच वेळी निवडणुकीचे मतदान होणार असल्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांना अनेक ठिकाणच्या मतदानापासून रोखणे शक्य आहे. पण ज्या मतदाराचे नाव उत्तर प्रदेश, बिहार अथवा अन्य राज्यात असेल अशा नागरिकांना मतदानापासून दूर ठेवणे शक्य होणार नाही. त्यांच्याकडे मुंबईतील वास्तव्याचे मतदार ओळखपत्र व आधार कार्ड असेल ते मतदान करू शकतात. मग अशा मतदारांनी बिहार अथवा उत्तर प्रदेश व अन्य राज्यांमध्ये मतदान केले असेल तरी, त्यांना मतदान करण्यापासून अडवणे शक्य नसल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.