Maharashtra Police News  Pudhari File Photo
मुंबई

Kalyan Police: निवडणूक कर्मचाऱ्यांना दीड ते दोन हजार, पोलिसांना मात्र फक्त 500 रुपये भत्ता; पोलिसाकडून शासनास पैसे परत

कल्याणात स्वाभिमानी पोलिसाकडून भत्ता शासनास परत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या नेतिवलीतील केडीएमसीच्या शाळा क्र. १९ मधील मतदान केंद्र क्रमांक ९८/३३ (तळ मजला, खोली क्र. १ मध्ये शुक्रवारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला. या केंद्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्याचा तक्ता समोर आला. या तक्त्यानुसार, मतदान केंद्रावरील इतर निवडणूक अधिकाऱ्यांना १५५० ते २००० रुपयांपर्यंत भत्ता देण्यात आला.

मात्र या केंद्रात बंदोबस्तावर असलेल्या विलास दादाराव मुंडे या पोलिस कर्मचाऱ्याच्या नावासमोर केवळ ५०० रुपये रक्कम लिहिण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून झालेल्या भत्त्यातील तफावत पाहून या स्वाभिमानी पोलिसाने आपला भत्ता शासनाला साभार परत केला.

या केंद्रात कर्तव्यावर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांना मिळणारा भत्ता अत्यंत कमी असल्याचे लक्षात येताच विलास मुंडे यांनी भत्त्याच्या तक्त्यातील रक्कमेसमोर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यांनी तक्त्यावर अधिकृतपणे "देय मान्य नाही, शासन परत" असे लिहून आपला विरोध नोंदवला आहे. दिवसभर उन्हात उभे राहून आणि संवेदनशील केंद्रांवर ड्यूट्या करूनही मिळणारा तुटपुंजा भत्ता म्हणजे केलेल्या कष्टाची थट्टा असल्याची भावना पोलिस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

सामान्य नागरिकांतही नाराजी

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हजारो पोलिस बांधव आणि भगिनींनी अहोरात्र सेवा दिली. मात्र कल्याणमध्ये एका मतदान केंद्रावर निवडणूक ड्युटीसाठी देण्यात आलेल्या तुटपुंज्या भत्त्यावरून सामान्य नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने केवळ ५०० रूपये भत्ता देण्याच्या शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हे मानधन स्वीकारण्यास स्पष्ट नकार देऊन परत केला आहे.

समाज माध्यमांवर भूमिकेचे स्वागत

निवडणूक प्रक्रियेत पोलिस कर्मचारी मतदानापूर्वी दोन दिवस आणि मतदानानंतर पेट्या जमा होईपर्यंत बंदोबस्तावर असतात. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलिसांना देखिल तितकेच किंवा त्याहून अधिक वेळ कामावर रहावे लागते. असे असताना भत्त्यामध्ये एवढी मोठी तफावत का ? असा सवाल पोलिस कर्मचाऱ्यांकाढून उपस्थित केला जात आहे. विलास मुंडे यांनी घेतलेल्या या भूमिकेचे समाज माध्यमांवर मात्र स्वागत करण्यात येत आहे. गृह विभागाने पोलिसांच्या निवडणूक भत्त्याबद्दल पुर्नविचार करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT