

Kishori Pednekar BMC Election Result: मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत प्रभाग क्रमांक १९९ मधून किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली आहे. तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा मैदानात उतरवले आणि पेडणेकर यांनी हा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यानंतर भाजपकडून त्यांचा अर्जावर हरकत देखील घेण्यात आली होती. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती.
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर अत्यंत आक्रमक पावित्र्यात दिसल्या. त्या म्हणाल्या, "माझ्यावर आरोप करणे हा विरोधकांचा धंदाच आहे. कोर्टाने जेव्हा ९० दिवसांचा वेळ दिला होता, तेव्हा हे लोक कोर्टात का गेले नाहीत? आता निव्वळ आरोप करून काय फायदा? मी बाळासाहेबांची निष्ठावान सैनिक आहे आणि मी माझे काम प्रामाणिकपणे केले आहे."
निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर 'कोविड बॉडी बॅग' घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, "मी घोटाळे वगैरे मानत नाही. संपूर्ण मुंबईने पाहिले आहे की, कोविडच्या भीषण संकटात मी स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून काम केले आहे. मी परिचारिका म्हणून सेवा दिली, लोकांचे जीव वाचवले. त्याचेच फळ आज मला जनतेने या विजयारूपाने दिले आहे. विरोधकांनी केलेल्या खालच्या पातळीवरील आरोपांना मी ईंटाचे उत्तर दगडाने दिले आहे."
वरळी हा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पेडणेकरांच्या विजयामुळे या बालेकिल्ल्यावर ठाकरेंचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली. "आईचा आशीर्वाद आणि जनतेची साथ यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे, आता यापुढे अधिक जोमाने मुंबईकरांची सेवा करेन," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.