मुंबई : नगरसेवकांच्या कामातून शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख राहिली पाहिजे. नागरिकांच्या मनात नगरसेवकांविषयी एकही चुकीचा विचार निर्माण होऊ नये, हाच आपल्या कामाचा खरा निकष असावा. आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सत्तेचा वापर करा. प्रत्येक नागरिकांसाठी समान न्यायाने काम करा. सत्ता म्हणजे विकास. प्रथम कामांचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले.
मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधत मार्गदर्शन केले. शिंदे म्हणाले की, आपण केलेली कामे लोकांच्या लक्षात यायला हवीत. शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असे कोणतेही काम आपल्या हातून घडू नये, याची प्रत्येक नगरसेवकाने खबरदारी घ्यावी. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळी उठून आपल्या वॉर्डमध्ये साफसफाई झाली आहे की नाही याची पाहणी करा. कुठे खड्डे पडले असतील तर तात्काळ दुरुस्ती करून घ्या. संपूर्ण वॉर्ड चकाचक आणि स्वच्छ दिसायला हवा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘डीप क्लीन ड्राइव्ह’सारखे प्रयोग आपल्या प्रभागात राबवा आणि संपूर्ण यंत्रणा वापरून प्रभाग स्वच्छ ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी 19 ‘लाडक्या बहिणी’ विजयी झाल्या आहेत. पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता आपल्या प्रभागात शिवसेनेचे काम सुरू ठेवावे. छोट्या-मोठ्या चुकांमुळे काही उमेदवार पराभूत झाले असले तरी त्यांनी लोकांसाठी काम करत राहावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाने स्वतःच्या प्रभागासोबतच आणखी एक-दोन प्रभागांच्या विकासासाठीही पुढाकार घ्यावा. जुन्या नगरसेवकांनी नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन करावे. निधी कसा मिळवायचा, प्रस्ताव कसे द्यायचे आणि कामांचा पाठपुरावा कसा करायचा, याची माहिती नव्या नगरसेवकांना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
शिंदे म्हणाले की, विरोधकांनी भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, तर आपण विकासाला प्राधान्य दिले. लोकांनी भावनिकतेला नाकारून विकासाला मतदान केले, हेच या निकालातून स्पष्ट झाले आहे.ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने या निवडणुकीत 90 जागा लढवल्या असून पक्षाला 32 टक्के मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणूक असो वा ग्रामपंचायत निवडणूक, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. महाराष्ट्रातील जनतेने काही पक्षांना पाचव्या क्रमांकावर ढकलले असून, जनतेच्या कोर्टात जाणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठवले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रत्येक वॉर्डमध्ये किमान दोन ते तीन मोठी विकासकामे उभी राहिली पाहिजेत, ज्यातून नागरिकांना प्रत्यक्ष बदल जाणवेल. मार्केट, अभ्यासिका आणि दवाखाने उभारण्यावर भर द्या. लोक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात तेव्हा विकासकामे सुरू असल्याचे त्यांना दिसायला हवे, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांशी वाद घालण्यापेक्षा समन्वय ठेवा आणि टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करा, असा सल्ला देत शिंदे यांनी सांगितले की, या निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रभागात बदल झालेला दिसला पाहिजे. जे निर्णय घेतले आहेत, त्यांची अंमलबजावणी करा, असे आवाहन त्यांनी केले.