

मुंबई : धर्म हीच आपली मार्गदर्शक आणि चालक शक्ती आहे. धर्माचे सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य आहे. जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरून होत राहील,तोपर्यंत भारत विश्वगुरू असेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
मुंबईत घाटकोपर येथे विहार सेवक ऊर्जा मिलन या धार्मिक संमेलनात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. यावेळी मोहन भागवत म्हणाले, धर्म संपूर्ण सृष्टीची चालक शक्ती आहे. सृष्टी बनली तेव्हा तिच्या संचालनाचा जो नियम बनला, तोच धर्म आहे. त्यावरच सगळे चालू आहे. निधर्मी असा प्रकार नसतो. एखादे राज्य धर्मनिरपेक्ष असू शकते, मात्र मानवासह विश्वातील कोणतीही बाब ही धर्मनिरपेक्ष असू शकत नाही.
प्रत्येक घटकाचा स्वतःचा धर्म असतो,जसा पाण्याचा धर्म वाहणे आहे, अग्नीचा धर्म जाळणे. तसेच, पुत्र धर्म, राजधर्म असे सर्वांचे कर्तव्यधर्मही आहेत. सृष्टीच्या अनुकूल वाटचाल हीच धार्मिकता असल्याचे मोहन भागवत म्हणाले. जगात अध्यात्माचा अभाव आहे. मात्र भारताला आपल्या पूर्वजांकडून अध्यात्माचा वारसा मिळाल्याचेही मोहन भागवत म्हणाले. वैश्विक सत्याच्या धर्माचे सत्य संतांना उमगले.धर्म ज्या सत्यावर आधारित आहे, त्याचे ज्ञान संतांना उमगले.
याच सत्याच्या सान्निध्यात जे सतत वास करतात त्यांना संत म्हणतात. त्यामुळेच संतांच्या आदेशाला नाकारू शकत नाही, अशी भावना देशाचे पंतप्रधान व्यक्त करतात. धर्मरूप संत प्रत्यक्ष नाहीत, असा कोणताच कालखंड भारताच्या इतिहासात नव्हता आणि भविष्यातही नसेल, असेही भागवत म्हणाले. त्यामुळे आपल्याकडे नेतृत्व हे आध्यात्मिक संतसज्जनांकडेच राहिल्याचे भागवत म्हणाले.