

मुंबई : वाराणसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मर्णिकर्णिका घाटावरील तोडकामावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचा हा प्रयत्न असून अत्यंत निर्दयीपणे हा घाट आणि त्यावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत. सरकारने याप्रकरणी तातडीने माफी मागावी, अन्यथा काँग्रेसकडून आत्मक्लेश आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी मुंबईत दिला.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवड मंडळाची बैठक रविवारी मुंबईत पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर सपकाळ यांनी मणिकर्णिका घाटाचा मुद्दा उपस्थित केला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अहिल्यादेवींचा 300 वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, तर दुसरीकडे अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेनेसमोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे. त्याने जसे सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले, तसाच हा प्रकार असल्याचा आरोप सपकाळ यांनी यावेळी केला.
या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटासोबत जाणार नाही. वैचारिक तडजोड केली जाणार नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.