'अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे' File Photo
मुंबई

राज्‍यात अतिवृष्‍टी : मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज (रविवार) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी.

पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT