दोन्ही पवार एकत्र आले अन् बोललेही!

अजित पवार आल्यानंतर शरद पवार खुर्चीतून उठून उभे राहिले
Ajit Pawar and Sharad Pawar
दोन्ही पवार एकत्र आले अन् बोललेही!file photo

पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शासकीय कार्यक्रमातदेखील दोन्ही पवारांनी एकमेकांकडे बघणेदेखील टाळले. मात्र, दोन्ही पवार पुण्यात शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीच्या निमित्ताने एकत्रही आले आणि प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात बोललेही; याची चांगलीच चर्चा रंगली होती. बैठकीत खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बारामती येथे झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात दोन्ही पवार एका व्यासपीठावर आले होते खरे; पण त्यांनी एकमेकांकडे बघितलेसुद्धा नव्हते. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या, प्रचारामध्ये एकमेकांवर सडकून टीकाही केली. एकमेकांवर टीका अजूनही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर पुन्हा दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून रंगत आहेत. दरम्यान, डीपीसीचे अध्यक्ष अजित पवार हे असल्याने, बैठकीला अगोदरच पोहोचलेले शरद पवार यांनी प्रॉटोकॉल पाळत अजित पवार आल्यानंतर खुर्चीतून उठून उभे राहिले. शरद पवारांनी पाळलेल्या या प्रोटोकॉलचीदेखील बैठकीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू होती.

बैठकीमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना घेरण्याचा प्रयत्नही केला. विधानसभा काही दिवसांवर आल्याने ही बैठक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याची. शरद पवार यांनी पाण्याचे प्रदूषण होत असल्याबाबत प्रश्न केला. त्यावर अजित पवार यांनी पाण्याचे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना नोटीस दिल्याचे सांगितले. शरद पवार यांनी कोणत्या तालुक्यांना किती निधी दिला, विचारल्यानंतर अजित पवार यांनी आता सर्व माहिती उपलब्ध नाही; मात्र सर्व माहिती घेण्याचे मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देतो, असे सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यात वाक्युद्ध रंगल्यानंतर अजित पवार यांनी समितीच्या बैठकीमध्ये कोण बोलू शकतो, यावर भाष्य केले. त्यानंतर बैठकीमध्ये शरद पवार यांनी बोलणे टाळले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news