मुंबई

रजनी पाटील यांना काँग्रेसकडून महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राजीव सातव यांच्या जागी रजनी पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. राज्यपाल नियुक्त प्रलंबित असलेल्या १२ आमदारांच्या यादीमध्येही त्यांचा समावेश आहे. रजनी पाटील यांच्या रुपाने काँग्रेसने पुन्हा मराठवाड्यातील चेहरा दिला आहे.

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये रिक्त झालेल्या ६ राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोगानुसार, त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी झाली आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसच्या या युवा नेत्याचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता.

आयएडीएमके (IADMK) नेते केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूतील राज्यसभेची जागा या वर्षी ७ मे २०२१ रोजी रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. याशिवाय, तामिळनाडूमधूनच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली. ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता.

६ मे २०२१ रोजी मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झाली. मानस भुनिया आता ममता सरकारमध्ये मंत्री आहेत. याशिवाय बिस्जित दामरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली. तर, मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

२२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. मतदान आणि मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="40688"]

SCROLL FOR NEXT