मुंबई : चेंबूरच्या प्रभाग क्र. 153 मधील घाटले गाव परिसरातील मुंबई पब्लिक स्कूलच्या पोलिंग बूथवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र महाडीक हे रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास आढळून आले. ही माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.
शिवसैनिकांनी पोलिसांना पाचारण करून शिंदे गटाचे पदाधिकारी रवींद्र महाडीक यांना ताब्यात दिले. मात्र तोपर्यंत जमलेला जमाव अधिकच आक्रमक झाला होता. संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप करत येथील निवडणूक पुढे ढकलावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बंदोबस्त वाढवत जमावाला समज देत परिस्थिती नियंत्रणात आणली. पहाटे 4 वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. गोवंडी पोलिसांनी रवींद्र महाडीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रभागातून शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तन्वी तुषार काते तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मिनाक्षी अनिल पाटणकर या निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी दिवसभर या रात्रीच्या घटनेचे पडसाद परिसरात उमटताना दिसून आले. संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र तरीही मतदारांनी तणावपूर्ण शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला.