मुंबई : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज नोंदणी करताना आधार कार्ड, अपार आयडी आणि दहावी-बारावीच्या गुणपत्रिकेतील नावामध्ये तफावत असली, तरीही त्याचा अर्जावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
सीईटी कक्षामार्फत सध्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी आणि शैक्षणिक कागदपत्रांवरील नावातील तफावतीमुळे अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. यावर सीईटी कक्षाने अर्ज प्रणालीत आवश्यक बदल केले असून विद्यार्थ्यांना अडथळ्याविना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याचे म्हटले आहे.
वैयक्तिक किंवा डेमोग्राफिक तपशीलांतील फरकाच्या कारणावरून कोणताही प्रवेश परीक्षा अर्ज बाद केला जाणार नसल्याचे कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
सीईटी ऑनलाइन अर्ज प्रणालीत उमेदवाराच्या नावासाठी तीन स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आधारप्रमाणे नाव, प्रणालीद्वारे आपोआप भरण्यात येणारे आधारप्रमाणे नाव उमेदवाराने स्वतः भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच नाव, जन्मतारीख व इतर वैयक्तिक तपशील वैध कागदपत्रांनुसार भरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे उमेदवारांना आधार कार्ड, बारावी प्रमाणपत्र किंवा इतर मान्य दस्तऐवजांनुसार माहिती भरणे शक्य होणार आहे.
वैयक्तिक तपशीलांमध्ये तफावत असली तरी कोणत्याही उमेदवाराला अर्ज भरणे, सादर करणे किंवा पूर्ण करणे यापासून अडविले जाणार नाही. अशा तफावतींमुळे कोणताही अर्ज बाद केला जाणार नसल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
अर्ज नोंदणीदरम्यान अनवधानाने चुकीची माहिती भरली गेली, तरी त्याचा अर्ज सादरीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. आवश्यकतेनुसार कॅप फेरीदरम्यान निर्धारित कार्यपद्धतीनुसार ही माहिती दुरुस्त करता येणार आहे.