akhil chitre pudhari photo
मुंबई

BMC Election 2026: भाजपनं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांच्या पुतळ्यांसमोर बायका नाचवल्या.... शिवसेनेने केला Video शेअर

नुकतेच भाजपचे केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांनी गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

Anirudha Sankpal

BMC Election 2026 Akhil Chitre Video : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्यातच वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढली आहे. नुकतेच भाजपचे केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांनी गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिल चित्रेंकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात भाजपच्या प्रचार सभेवेळी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोरच महिला अत्यंत आक्षेपार्ह हावभाव करत नाचत असल्याचं दिसत आहे.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?

हा व्हिडिओ शेअर करून शिवसेना ठाकरे गटानं भाजपवर टीका केली आहे. भाजप हा बायकांना नाचवून गर्दी जमवत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्याने केला आहे.

अखिल चित्रे आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, 'भाजपच्या महाभागांना याचंही भान राहिलं नाही की मागं छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. आमच्या महापुरूषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा?'

भाजप अन् वाद

अखिल चित्रेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला याबाबत स्पष्टीकरण अन् सारवासारव करत फिरावं लागणार आहे. या व्हिडिओमुळं जनमानसात संतापाची लाट उमटत आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनी काही दिवसांमध्ये वादग्रस्त विधाने केली आहेत. केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार असल्याचं वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते.

रविंद्र चव्हाण देखील वादाच्या भोवऱ्यात

त्यावर संजय राऊत यांनी गुजरातला एकही महामानव होऊन गेला नाही का असा सवाल करत आमचे महापुरूष का चोरता असा टोला लगावला होता.

दरम्यान, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरूद्ध देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांनी लातूरमधून शंभर टक्के विलासरावांच्या स्मृती पुसल्या जातील असं वक्तव्य केलं होतं. त्याला रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT