

Ravindra Chavan Controversy On Vilasrao Deshmukh Latur: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये एक धक्कादायक वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत. यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. रविंद्र चव्हाण यांनी जाहीर सभेत बोलताना लातूरमधून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केलं होतं. विलासरावांचे पुत्र काँग्रेस नेते अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविंद्र चव्हाण लातूरच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी गर्दीला उद्येशून म्हणाले की आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर लक्षात येतंय की शंभर टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील. यात काही शंका नाही.'
रविंद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर राजकीय पटलावर प्रतिक्रिया उमटल्या असून अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रितेश म्हणतो, 'लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं त्यांच्या मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र!'
अमित देशमुख यांनी देखील रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका करत ही महाराष्ट्राची अन् लातूरची संस्कृती नाही असं सांगितलं. ते म्हणाले, 'भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येत जे विधान केलं आहे. त्यावरून हा पक्ष कोणत्या स्तराला जाऊन राजकारण करतोय हे दिसून येतं. लातूर अन् महाराष्ट्राची देखील ही संस्कृती नाही. त्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.' रविंद्र चव्हाण यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसात सोशल मीडियावर देखील उमटले आहेत.