

Sanjay Raut On CR Patil Statement: भाजपचे केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुजरातमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं. त्यांनी शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे वक्तव्य केलं. त्यावरून टीका होत असतानाच आता शिवसेनेचे नेते अन् खासदार संजय राऊत यांनी भाजप विशेषकरून भाजपच्या गुजराती नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
आज पत्रकार परिषदेवेळी संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आवाहन केले. ते म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांना जात लावू नका... ते विश्वपुरूष होते. त्यांची जात काढण्यापेक्षा आधी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी माहाराज यांचे शिवस्मारक पूर्ण करा.'
संजय राऊत पुढे म्हणाले, 'शिवाजी महाराज पाटीदार होते. अमुक होते तमुक होते. हा विषय आताच काढण्याचं कारण काय? महाराष्ट्र अन् मराठी माणसाला डिवचण्याचाच हा प्रकार आहे. तुम्ही कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेस पळवली. उद्या बाळासाहेब ठाकरे देखील पळवाल. आता हे शिवाजी महाराज देखील पळवायला लागलेत.'
हे निर्लज्ज लोकं आहेत. तुम्ही शिवाजी महाराज पळवताय. तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत पळवताय. तुमच्याकडे दैवतं नाहीत का असा सवाल देखील राऊत यांनी विचारला. त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये सगळे राक्षस आहेत का..? अजित पवार यांच्या भाषेत सगळे बकासूर आहेत का...? तुमच्या गुजरातमध्ये कोणी माहन नेते जन्माला आलेच नाहीत का? अशा प्रश्नांची सरबत्ती करून शिवाजी महाराज पाटीदार होते म्हणणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.
दरम्यान, राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांना अपक्ष उमेदवार माघारीबाबत दबाव टाकल्याप्रकरणी क्लीन चीट मिळाल्यावर निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट झाला आहे असं राऊत म्हणाले.