मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा -शिवसेना महायुतीची सत्ता येणार असली तरी विविध समित्यांच्या वाटपावरून महायुतीमध्ये अजूनही मतभेद आहेत. पालिकेतील महत्त्वाच्या स्थायी व सुधार समितीवर दोन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे रुसवेफुगवे होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे साहजिकच सत्तेमधील त्यांचा वाटा मोठा असणार. पण 29 नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला समान वाटा हवा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला सुरुवातीला महापौरपद हवे होते. मात्र भाजपाने महापौरपद देण्यास नकार दिल्यामुळे उपमहापौरपदावर शिवसेनेने समाधान मानले आहे. परंतु स्थायी किंवा सुधार समिती मिळावी, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. पण दोन्ही समित्या भाजपा सोडायला तयार नसून शिवसेनेला शिक्षण व बेस्ट समिती सोडण्यास तयारी दर्शविण्यात आली. पण शिवसेनेला ते मान्य नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत समित्यांचा तिढा सुटलेला नाही. स्थायी समिती अध्यक्षपद दोन वेळा शिवसेनेला तर तीन वेळा भाजपाला असाही प्रस्ताव आहे. सुधार समितीबाबतही असाच प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाने सलग पाच वर्षे स्थायी समिती न सोडण्याचा प्रस्ताव दिल्याचे समजते. सुधार समिती मात्र पाच वर्षात दोन वेळा शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपाची आहे. एवढेच काय तर शिक्षण व बेस्ट समितीचे अध्यक्षपद पाच वर्षे शिवसेनेला देण्याची तयारीही भाजपाची असल्याचे समजते. पालिकेतील आरोग्य, महिला बालकल्याण, बाजार उद्यान, विधी, स्थापत्य शहर व स्थापत्य उपनगर या विशेष समित्यांपैकी दोन समित्या शिवसेनेला तर तीन समित्या भाजपाला मिळाव्यात असाही प्रस्ताव आहे. यावरही अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही. समिती वाटपावरून येत्या दोन दिवसांत पुन्हा वाटाघाटी होऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावर अधिकृतरीत्या कोणी बोलायला तयार होत नाही.
चार वैधानिक व सहा विशेष समिती कोणत्या पक्षाला किती येणार, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेत ज्या पक्षाचा महापौर व ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांच्याकडे स्थायी समिती जाते, असा फॉर्र्म्युुला आहे. त्यामुळे यावेळी भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक लक्षात घेता, आपल्याला स्थायी समिती मिळावी असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत हीच प्रथा परंपरा चालत आली असल्याची आठवणही भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना नेत्यांना करून दिल्याचे बोलले जात आहे.