पुढारी ऑनलाईन:
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हीच चर्चा राजकीय वर्तृळात सुरू होती. पण भाजपकडून अचानक शिवसेनेचे बंडखोर नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्यालाच हाताशी धरून ठाकरेमुक्त शिवसेनेचा अप्रत्य नारा भाजपने दिला असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे, असे मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
हेमंत देसाई यांच्या मतानुसार, राज्यातील सध्याची राजकीय उलथापालथ पाहता ठाकरेमुक्त शिवसेना हेच भारतीय जनता पक्षाचे मुख्य उद्दीष्ठ आहे. शिवसेनेचे संपूर्ण अस्तित्व संपविणे हेच भाजपचे मुख्य ध्येय आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही दत्तक शिवसेना आहे. ज्या शिवसेनेनं भाजपपुढे अगदी लोंटांगण घातले आहे. या शिवसेनेचा फायदा भाजपला शतप्रतिशत भाजप करण्यात होणार आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना हे समीकरण भाजपला नेस्तानाबुत करायचे आहे.
महाराष्ट्रावर हक्क सांगताना महाराष्ट्रातील 'आयकॉन'ची नावं घेवून भाजप सध्या राजकारण करत आहे. भाजपने कधीच शिवाजी महराजांचे नाव प्रचारात घेतले नाही; पण २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सर्वप्रथम भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले. आत्ता भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जयजयकार करत आहे. त्यांना त्यांच्या हिंदुत्वाला रेटण्याचा प्रयत्न करत आहे; पण अनेकवेळा बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे मतभेद देखील झाले आहेत. यावेळी बाळासाहेबांनी भाजपला कमळाबाई म्हणून हिनवलंही आहे, असेही हेमंत देसाई म्हणाले.
आज शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्त्वादी विचार घेऊन सत्तेत आहे आहेत. त्यांच हिंदुत्त्वाच्या विचाराला अनेकवेळा बाळासोहेबांनी बाजूला ठेवत माणुसकीला महत्त्व दिले होते. एकेकाळी बाळासाहेब काँग्रेसशी युती देखील केली होती. अतुलेंच्या काळात निवडणूक न लढण्याचा निर्णयही घेतला होता. काँग्रेसचे प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांना जाहीर पाठींबा दिला होता. महापालिकेत देखील बाळासाहेबांनी मुस्लिम लीगशी समझाेता केला होता. म्हणजेच वेळोवेळी बाळासाहेबांनी हिदुत्त्वाविरोधी देखील भूमिका घेतली होती, असेही देसाई म्हणाले.
शिवसेनेला आता यातून भरारी घ्यायची असेल तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी रस्त्यावर उतरून काम केले पाहिजे. ग्रामीणभाग जाणून घेऊन येथील प्रश्न सोडविले पाहिजेत. ग्रामीण भागातील प्रश्न अभ्यासून ते सोडवले पाहिजेत. यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षाबरोबरच महाराष्ट्रातील जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना हाताशी धरून राज्यातील आपली ताकद वाढवली पाहिजे, असेही हेमंत देसाई यांनी नमूद केले.
शिंदेंच्या बंडामागे 'ठाकरे' मुक्त शिवसेना हाच भाजपचा उद्देश : हेमंत देसाई