मुंबई : म्हाडामार्फत राबविण्यात येत असलेल्या वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 15593 पुनर्वसन सदनिकांची 100 टक्के उभारणी पूर्ण करून या सदनिकांचा ताबा डिसेंबर 2029 पर्यंत लाभार्थ्यांना देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून 864 रहिवाशांना सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावीवाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावर्षी तिन्ही बीडीडी चाळींतील एकूण 4 हजार 322 रहिवाशांना नव्या घरांचे वितरण करण्यात येणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
गेल्या वर्षी वरळी बीडीडीतील 556 कुटुंबांना टॉवरमधील घरांचा ताबा देण्यात आला. यावर्षी एप्रिलमध्ये 845, मे महिन्यात 574 आणि जुलैमध्ये 271 जणांना वरळी येथील घरांचा ताबा मिळणार आहे. तसेच नायगाव बीडीडीतील 864 रहिवाशांना सोमवारी चावीवाटप करण्यात आल्यानंतर मे महिन्यात आणखी 537 जणांना चावीवाटप केले जाणार आहे. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला असून जूनमध्ये 547 जणांना, ऑक्टोबरमध्ये 342 जणांना आणि डिसेंबरमध्ये 342 जणांना नव्या घरांच्या चाव्या मिळतील. गेल्या वर्षीचे 556 वगळता केवळ 2026 या वर्षात 4 हजार 322 बीडीडीवासीयांचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील तिन्ही बीडीडी चाळींतील एकूण 15 हजार 593 रहिवाशांना 2 बीएचके घर देण्यात येणार आहे. नायगाव येथील 23 चाळींतील 1 हजार 401 घरांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी 864 जणांना सोमवारी चाव्या मिळाल्या. वरळी येथील 4 हजार 893, नायगाव येथील 1 हजार 74 आणि ना. म. जोशी मार्ग येथील 1 हजार 582 म्हणजेच एकूण 7 हजार 550 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या एकूण 9 हजार 815 घरांचा विचार करता बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची प्रगती 63 टक्के आहे. उर्वरीत 5 हजार 778 घरांचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू केले जाणार आहे.
पिढ्यान्पिढ्या बीडीडी चाळीतल्या छोट्याशा घरात तडजोडीचे आयुष्य जगल्यानंतर आता आयुष्याची समाधानी संध्याकाळ येथील ज्येष्ठ नागरिकांना अनुभवता येणार आहे. 74 वर्षीय वसंत आठवले यांची बीडीडी चाळीत राहणारी ही पाचवी पिढी आहे. 72 वर्षीय छबुबाई कांबळे या चौथी पिढीच्या प्रतिनिधी आहेत. 1970साली लग्न करून त्या बीडीडी चाळीत आल्या. त्यांचे जुने घर शेवटच्या मजल्यावर असल्याने उन्हाळ्यात प्रचंड गरम होत असे. यंदाचा उन्हाळा त्या हवेशीर घरात काढणार आहेत. आता त्यांना चार जिने चढावे लागणार नाहीत. सार्वजनिक शौचालयात जावे लागणार नाही, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
डिसेंबर 2027 पर्यंत वरळी येथील 821, नायगाव येथील 537 घरांचे वितरण केले जाईल. यामुळे प्रकल्पातील एकूण 6 हजार 236 म्हणजेच 40 टक्के रहिवाशांना घरांचे वितरण पूर्ण होईल. 2029पर्यंत तिन्ही ठिकाणचे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. तसेच शिवडी बीडीडी चाळींतील 966 घरांच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने केंद्र शासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.