मुंबई : व्यावसायिक आणि औद्योगिक गॅसपुरवठा बंद करण्याचे फर्मान केेंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून जारी झाल्याने रविवारपासून हॉटेल व्यवसायाला मध्य पूर्वेतील युद्धाचे तडाखे बसण्यास सुरुवात झाली आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात येत असल्याचा दावा आहार या हॉटेलचालकांच्या मध्यवर्ती संघटनेने केला आहे.
गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर पुढील तीन-चार दिवसांत पन्नास टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद ठेवावी लागतील, अशी शक्यताही आहार संघटनेने व्यक्त केली. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या कार्यालयाशी आहारने आधीच संपर्क साधला आहे. मात्र, तोडगा निघालेला नाही. मंगळवारी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट आहारचे शिष्टमंडळ घेणार असून, गॅसपुरवठा सुरळीत करण्याचे साकडे घालणार आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये 9 हजारांवर रेस्टॉरंट्स आणि बार आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याने या सर्व हॉटेल्सचा धंदा मंदावू लागला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा करण्यास मनाई नाही. मात्र, घरगुती गॅसपुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश असल्याचा खुलासा शासकीय यंत्रणांकडून केला जात आहे. यातून हॉटेल्सना गॅस सिलिंडर मिळतच नसल्याचे चित्र समोर आले आणि त्यातून 20 टक्क्यांहून अधिक छोटी-मोठी हॉटेल्स बंद करावी लागली. आता तर संपूर्ण हॉटेल व्यवसायावरच तात्पुरत्या टाळेबंदीची टांगती तलवार आहे.
दरम्यान, बंगळुरूमध्येही मंगळवारपासून हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
गॅस टंचाईची धग उद्योगांनाही बसू लागली असून, कतारने द्रवीकृत नैसर्गिक वायू अर्थात एलएनजीचे उत्पादन थांबवल्याने भारताला होणारा मोठा पुरवठा खंडित झाला आहे. त्यातून छत्रपती संभाजीनगरात पाच मोठ्या उद्योगांचे उत्पादन ठप्प झाले व आणखी 45 उद्योग त्याच मार्गावर आहेत.
शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत, वाळुज औद्योगिक वसाहतीतील ॲटोमोबाईल उद्योगालाही गॅस तुटवड्याचा फटका सहन करावा लागत आहे.