मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या खेळाडूंच्या वार्षिक कराराच्या (सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) संरचनेत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. या नवीन आराखड्यात संघातील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा व विराट कोहली यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता चर्चेत आहे. ‘बीसीसीआय’ आपल्या करार पद्धतीतून ‘ए प्लस’ (ए+) ही सर्वोच्च श्रेणी रद्द करून केवळ ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीनच श्रेणी कायम ठेवण्याचा विचार करत आहे.
‘बीसीसीआय’च्या या संभाव्य निर्णयामुळे केवळ विराट आणि रोहितच नव्हे, तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या श्रेणीतही घट होऊ शकते. सध्या हे चारही खेळाडू ‘ए प्लस’ श्रेणीचा भाग आहेत. नवे प्रस्तावित मॉडेल लागू झाले, तर बुमराहला ‘ग्रेड-ए’ मध्ये स्थान मिळू शकते. तसेच, विराट, रोहित आणि जडेजा यांना थेट ‘ग्रेड-बी’ मध्ये ढकलले जाऊ शकते.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या रचनेत बदल करण्याची सूचना केली आहे. समितीने 7 कोटी रुपये मानधन असलेली ‘ए प्लस’ श्रेणी रद्द करून केवळ तीन श्रेणी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या बदलामुळे खेळाडूंच्या मानधनाच्या रचनेतही मोठे फेरबदल होतील.
एप्रिल 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या करारानुसार, रोहित, विराट, जडेजा आणि बुमराह हे ‘ए प्लस’ श्रेणीत होते. याशिवाय, सिराज, के. एल. राहुल, गिल, पंड्या, शमी आणि पंत यांचा समावेश ‘ग्रेड-ए’ तर सूर्यकुमार, जैस्वाल आणि कुलदीप यांसारखे खेळाडू ‘ग्रेड-बी’ मध्ये होते. रिंकू सिंग, शिवम दुबे आणि संजू सॅमसन आदी खेळाडूंना ‘ग्रेड-सी’ मध्ये स्थान मिळाले होते.
ग्रेड-ए प्लस : 7 कोटी रुपये
ग्रेड-ए : 5 कोटी रुपये
ग्रेड-बी : 3 कोटी रुपये
ग्रेड-सी : 1 कोटी रुपये