Baramati Aircraft Accident Pudhari
मुंबई

Baramati Aircraft Accident: विमान अपघाताचा तपास वेळेत पूर्ण करू; केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वासन

बारामती येथील विमान दुर्घटनेची केंद्र सरकारकडून गंभीर दखल; पारदर्शक चौकशी व भविष्यातील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विमानाला झालेल्या अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. अत्यंत पारदर्शी पद्धतीने या घटनेचा सखोल तपास पूर्ण केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तसेच, फडणवीसांच्या सूचनेनुसार, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याचा शब्दही केंद्रीय मंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांना पत्र पाठवून बारामती विमान दुर्घटनेच्या सखोल तपासाची विनंती केली होती. बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाचजणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टळाव्यात,

यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी करत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री नायडू यांना पत्र पाठवले. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासह इतर पाचजणांचा मृत्यू हा अत्यंत गंभीर प्रकार असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले होते. फडणवीस यांच्या पत्राची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी तपास सुरू करण्यात आल्याचे कळविले.

बारामती येथील विमान अपघात आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाचजणांच्या झालेल्या मृत्यूची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतल्याचे केंद्रीय मंत्री नायडू यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या दुर्घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत, यादृष्टीने राज्य सरकारच्या

सूचनेची केंद्रीय मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच आवश्यक उपाययोजना केल्या जातील. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असून, स्थानिक प्रशासनाची मदतही अपेक्षित असल्याचे नायडू यांनी नमूद केले. संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT