

मुंबई : 2016 च्या मध्यावर बंद पडलेल्या पार्ले-जी बिस्किट कारखान्याच्या जागेवर आता व्यावसायिक संकुल उभे राहणार आहे. राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने या पुनर्विकास प्रकल्पाला परवानगी दिली असून येथील कारखान्याच्या जागेत 21 इमारती उभारण्यात येणार आहेत.
गेली अनेक वर्षे विलेपार्ले येथे पार्ले-जी या लोकप्रिय बिस्किटांचा कारखाना होता. कारखान्याच्या परिसरात बिस्किटांचा सुवास कायम दरवळत असे. 2016 साली हा कारखाना बंद पडला. त्यानंतर ही जागा पडीक होती. वर्षभरापूर्वी कंपनीने या जागेचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. 5.44 हेक्टर इतके या जागेचे क्षेत्रफळ आहे. येथे 1 लाख 21 हजार 698 चौरस मीटर इतके चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध झाले आहे. एकूण 3 हजार 961 कोटींचा हा प्रकल्प आहे.
पार्ले-जी कारखान्याच्या भूखंडावर 4 इमारती बांधल्या जातील. 28 ते 30 मीटर उंचीच्या या इमारतींना विमानतळ प्राधिकरणानेही ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र इमारत असेल.
संकुलात रेस्टॉरंट, कार्यालये व दुकानेही या भूखंडावर सध्या 508 झाडे आहेत. त्यापैकी 129 झाडे तोडली जाणार आहेत. 68 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तसेच नव्या 1203 झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड केली जाणार आहे. व्यावसायिक संकुल म्हणून विकास झाल्यानंतर या जागेत रेस्टॉरंट, कार्यालये व दुकाने उभी राहतील.