

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठा समूह पुनर्विकास कांदिवलीत होऊ घातला आहे. छत्रपती शिवाजी राजे संकुल येथील 53 गृहनिर्माण संस्थांचा एकत्रित पुनर्विकास येत्या काळात केला जाणार आहे. 12 एकरवर पसरलेल्या संकुलात 22 चौरस फुटांची 3 हजार 488 घरे आहेत.
अलीकडे मुंबईत समूह पुनर्विकास ही संकल्पना जोर धरत आहे. विविध गृहनिर्माण संस्था एकत्र येऊन पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे. यामुळे प्रकल्पाचे आरेखन अधिक चांगल्या प्रकारे होते. रहिवाशांना मोकळी जागा उपलब्ध होते तसेच इतर सुविधांचाही एकत्रित लाभ घेता येतो. त्यामुळेच कांदिवली येथे 2000 साली म्हाडाच्या भूखंडावर वसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी राजे संकुलाचा समूह पुनर्विकास करण्यात येत आहे.
म्हाडामार्फत मोतीलालनगर, अभ्युदयनगर, आदर्शनगर, वांद्रे रेक्लेमेशन, जीटीबी नगर, कामाठीपुरा या वसाहतींचा समूह पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. तसेच गृहनिर्माण संस्था खासगी विकासकामार्फत समूह पुनर्विकास करून घेत आहेत.
कांदिवलीच्या संकुलातील इमारती 26 वर्षे जुन्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. संकुलातील रस्ते अरूंद असल्याने येथून चालणे अडचणीचे ठरते. एकूण 53 गृहनिर्माण संस्थांपैकी 34 संस्थांनी पुनर्विकासासाठी संमती दर्शवली आहे. 19 संस्था अद्याप त्याबाबत विचार करत आहेत.
समूह पुनर्विकास झाल्यास प्रत्येक सभासदाला 610 चौरस फुटाचे घर मिळेल. पुनर्विकास होईपर्यंत प्रत्येक सभासदाला पहिल्या वर्षी 25 हजार, दुसऱ्या वर्षी 27 हजार आणि तिसऱ्या वर्षी 30 हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक सदनिकेसाठी
2.25 लाख कॉर्पस फंड दिला जाईल. पुनर्विकसित सदनिकांइतक्याच म्हणजेच 3 हजार 488 सदनिका विकासकाला विक्रीसाठी उपलब्ध होतील.