

नालासोपारा: सोशल मीडियाचा वापर करून राजकीय नेत्यांविरुद्ध गरळ ओकणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने धडा शिकवण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सुरज महेंद्र शिर्के या तरुणाची मनसे कार्यकर्त्यांनी नालासोपाऱ्यात चक्क धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरज शिर्के हा तरुण सोशल मीडियावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर जाऊन विधाने करत होता. या पोस्टमुळे मनसे आणि शिवसैनिक आक्रमक झाले होते. मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून या तरुणाच्या शोधात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा नालासोपारा परिसरात लपून बसल्याची खबर मनसे कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून त्याला पकडले. संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला आणि त्यानंतर त्याची अर्धनग्न अवस्थेत सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत धिंड काढली.
या घटनेनंतर किरण नकाशे यांनी समाज माध्यमांवर या कारवाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. "याला हीच भाषा समजते," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, "ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे काय हाल होतात हे सर्वांनी पाहिले आहे. तो मराठी असो वा अमराठी, जर कोणी पातळी ओलांडली तर त्याची अशीच मिरवणूक निघणार," असा थेट इशाराही नकाशे यांनी दिला आहे.