नवी मुंबई : एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये सध्या भाज्यांची चांगली आवक होत आहे. त्यात शुक्रवारी मुंबईतील किरकोळ व्यापारी बाजारात माल घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे भाजीपाला पडून राहिला. त्यामुळे दरांत आणखी 20 ते 30 टक्के घसरण झाली आहे. सध्या भाज्यांसाठी पोषक हवामान असल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुंबई महापालिकेकडून गेले काही दिवस मुंबईतील फेरीवाल्यांवर दररोज कारवाई सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हे फेरीवाले भाजीपाला खरेदीसाठी एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारीही आवक मोठ्या प्रमाणात झाली. मात्र मालाला उठाव नसल्याने भाजीपाला पडून राहिला. त्यामुळे व्यापाऱ्यांना भाव पाडून तो विकावा लागला. तरीही माल शिल्लक राहिल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम थेट भाज्यांच्या दरांवर झाला आहे.दरात सरासरी 20 ते 30 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, दोडका, गवार यांसारख्या भाज्यांचे दर कमी झाले आहेत.
कोथिंबीरची जुडी : 10 ते 12
पालक : 6 ते 7
शेपू : 8 ते 10
वाटाणा : 22 ते 28
गवार : 50 ते 80
ढोबळी मिरची : 36 ते 50
शेवगा शेंग : 50 ते 70
भेंडी : 26 ते 30
टोमॅटो : 10 ते 14
घेवडा : 16 ते 20
कारली : 30 ते 36
काळी वांगी : 16 ते 22
पदपथावरील कारवाईमुळे किरकोळ विक्रेते बाजारात येत नाहीत. त्यातच आवक जास्त असल्याने माल विक्री न झाल्याने पडून राहात आहे. परिणामी दर कोसळले आहेत. एकीकडे ग्राहकांना कमी दरांचा फायदा होत असला तरी दुसरीकडे शेतकरी आणि घाऊक व्यापाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच राहिल्यास बाजारातील ही मंदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.शंकर पिंगळे, घाउक व्यापारी, भाजी मार्केट