Daivi Sampatti in Dnyaneshwari Pudhari
मुंबई

Daivi Sampatti in Dnyaneshwari: अपैशुन, दया, अलोलुप्त आणि मार्दव : दैवी संपत्तीतील जीवनाला उन्नत करणारे चार रत्न

ज्ञानेश्वरीतील दैवी गुणांचे चिंतन – संतवाङ्मयाच्या प्रकाशात अपैशुन, दया, अलोलुप्त आणि मार्दव या सद्गुणांचा सखोल आध्यात्मिक ऊहापोह.

पुढारी वृत्तसेवा

॥अपैशुन, दया, अलोलुप्त आणि मार्दव ॥

अक्रोध, त्याग आणि शांती याविषयी चिंतन करताना आपण क्रोध निर्माणच होत नाही अशी “अक्रोध” अवस्था, अहंकाराचा सहजतेने केलेला त्याग आणि त्रिपुटीविरहीत अवस्था म्हणजे शांती याविषयी माहिती घेतली. वरील सद्गुणांना दैवी संपत्ती असं या अध्यायात संबोधल गेलं आहे, याचं पुनश्च: स्मरण करून देत आपण याच संपत्ती सोहळ्यातील पुढील रत्नांचं दर्शन घेऊ यात.

॥ श्री ॥

शांती नंतर माऊली अपैशुन या गुणाचा परिचय करून देतात. जगभरातील श्रीमंतांना एका ओळीत उभे करून त्यांचा परिचय उपस्थितांना करून देताना जसा यजमानांना आनंद व्हावा तसाच आनंद मला आज होतो आहे. माऊलींनी ज्या दैवी संपत्ती प्रधान तत्त्वांची नावे सांगितली त्यांना मी वाचकांसमोर माऊलींच्या कृपादृष्टीप्रमाणे परिचय करून देत आहे. माऊलींसारखं भाषासामर्थ्य, शब्दप्रभुत्व, प्रज्ञा, अभिजात सौंदर्यदृष्टी, प्रतिभा ही माझ्यात किंचितही नाही. तथापि मी माऊलींनी सांगितलेल्या दैवीसंपत्तीचा परिचय वाचकांना वाढपी म्हणून करून देतो आहे, याचाही भावस्पर्शी आनंदानुभव मी घेतो आहे.

1) अपैशुन :- (उणे न पाहणे)

जे अज्ञान व प्रमाद (जो सजग नाही) यांनी व्यापलेले आहेत. पूर्वकर्माप्रमाणे जे निंद्यपणाच्या सर्व बाबतीत जखडलेले आहेत, त्यांना सहाय्य करून त्यांची

दुःखे विसरायला लावतात. भारतीय दर्शनात (आध्यात्मात) प्रमादाला आध्यात्मिक प्रगतीतील मोठा अडथळा मानलेले आहे.

जे जीव अज्ञानाच्या अंधःकारात अडकलेले आहेत, ज्यांचा आत्मज्ञानाशी परिचय झालेला नाही, अशा जीवाला सजग करणारा सद्गुण म्हणजे “अपैशुन.”

अपैशुन गुणामुळे संतसज्जन (1) त्यांच्या पुढ्यात असलेल्या मनुष्यातील दोष आपल्या निर्दोष दृष्टीने शुद्ध करून मग त्यांच्याकडे अवलोकन करतात. (2) आपल्यातल्या चांगुलपणाने समोरच्या माणसातील कमीपणा दूर करून त्यास सात्विक बनवतात. (3) वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीत येण्यासाठी उपाय सुचवतात. (4) नीच मानवाला देखील उत्तमासारखे आदरणीय वागवतात. त्यांच्यावर दोषारोप करत नाहीत, त्यांच्याकडून दोषारोप घेतही नाहीत. (5) कोणाच्याही वर्मावर घाव घालत नाहीत, त्यांच्या पापकर्माचा उच्चार करून त्यांना दुःखी कष्टी करत नाहीत. दोषवाचक नामाने त्यांना हाक मारत नाहीत; कारण त्यामुळे त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या वेदनांची जाणीव अपैशुन गुण धारण करणाऱ्या संत सज्जनांस असते.

अपैशुन हा गुण मुमुक्षुसाठी उत्तम साधन असल्याचं माऊली सांगत हाच गुण मोक्षमार्गीचा सांगाती आहे हे सांगायला विसरत नाहीत.

अगा अपैशुन्यांचे लक्षण| अर्जुना हे फुडें जाण|

मोक्षमार्गीचे सुखासन| मुख्य हे गा ॥

“अपैशुन“ हा सद्गुण प्रापंचिकास अधिक गरजेचा आहे असं मला वाटतं. जगताना आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, परिवार, समाज यांच्यामधील कमीपणा पाहण्याचे केवढी सवय आम्हाला झालेली असते? नाही का? तो कमीपणा दाखवताना आम्हाला केवढा आनंद होतो? नाही का? त्यातून आम्हाला कसलं समाधान मिळत? नाही का? लोकांच्या उणे-दुणे पणाविषयी आपण किती जीभल्या चाटत बोलतो? हा आमच्यातील दांभिकपणा आम्ही अपैशुन हा गुण अंगीकारून दूर करू शकतो. अपैशुन या गुणाचं चिंतन करताना मला सानेगुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या कवितेतील काव्यपंक्ती स्मरतात -

जगी जे हीन अति पतित | जगी जे दीन पददलित|

तया जाऊन उठवावे | जगाला प्रेम अर्पावे|

अकरा कडव्यांच्या या कवितेत आर्तता, व्याकुळता, सहृदयता, मदतीची भावना, समर्पण, त्याग, प्रेम, दया, स्नेह, जिव्हाळा या सर्व सद्गुणांना व्यक्त करते. साने गुरुजीचं मातृहृदय या कवितेतील शब्दाशब्दांमधून पान्हावतं. यामधून “अपैशुन“ या सद्गुणांच चांदण प्रसवतं, शब्दांना माधुर्याचे धुमारे फुटतात. वाचणाऱ्याच्या, ऐकणाऱ्याच्या धमन्यांत ऊर्जेचा स्त्रोत प्रवाहित होतं. केवढे हे भाषासामर्थ !!!!

2) दया :- या सद्गुणांविषयी माऊली भरभरून निरूपण करतात

“दुःखीतांचे दुःख निवारण करण्यासाठी जो सदैव तत्पर असतो, अशावेळी जो आपले सर्वस्व अर्पण करायलाही सिद्ध होतो, त्या अर्पणात समर्पण व नि:स्वार्थ प्रेम असते, समोरच्या माणसाच्या दुःखाने जो व्यथित होतो तोच खरा दयावान.”

तैसे पुढिलाचेनि तापें| कळवळलिये कृपे|

सर्वस्वेसी दिधलेंही आपणये | न्यूनचि मानी॥

जगात सर्वत्र दुःख पसरलेले असताना आणि स्वतःच्या संसारातही अनेक दुःखांना सामोरे जाताना दयावान होता येते हे संतांकडूनच शिकवले जाते आणि आपणही ते निदान आपल्या स्वतःच्या ऐपतीप्रमाणे तरी दयावान होऊ शकतो. हल्ली रस्त्यावर अपघात झाला तर त्याचे “छायाचित्रीकरण” करणारी परंतु काडीचीही मदत न करणारी पिढी पाहिली की चिड आल्याशिवाय राहत नाही. याला कारण आपली शिक्षण-संस्कार प्रणालीच आहे. लहान वयात सानेगुरुजींच्या ज्यांनी कविता वाचल्या, “शामची आई” वाचली तो नवकीच सहृदय होऊन मदतीसाठी धावणार. ज्यांनी श्री ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं त्याचं हृदय हे प्रेमानं सदैव ओथंबलेलच असणार. पूर्ण चंद्राचं पौर्णिमेच प्रतिबिंब सर्वांना समान चांदणे देत शांतीचा वर्षाव करते. वाहते पाणी वाटेत येणारा खड्डा पूर्ण भरल्याशिवाय पुढे जात नाही. अगदी त्याप्रमाणे दयावान जीवनात येणाऱ्या सर्वांवर आपल्या हृदयातील दयाभावाचा वर्षाव करत राहतो.

3) अलोलुप्त :- “जीव जेंव्हा कौतुकानें देखील विषयांची इच्छा करत नाही, तेंव्हा मानवाच्या (जीवाच्या) जीवनात अलोलुप्त अवस्था स्थिर होते. हा सद्गुण “वैराग्य “अवस्थेच्या अत्यंत जवळचा, मानवाच्या जीवनात सुखाची अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी त्याला ऐहीक गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतात, पण केवळ ऐहीक गोष्टी म्हणजेच सुख आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही असंच आहे. याचं कारण “सुख” हे केवळ ऐहीकात नाही किंबहुना “सुख” प्राप्त करणे ही फार वेगळी बाब आहे. त्यासाठी सर्व ऐहिकात राहूनही जीवानं त्यातली अलिप्तता स्वतः जपावी. मला माझ्या जीवनात चरितार्थ चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कमावताच आल्या पाहिजेत,

कर्म करणे अटळ आहे. फक्त कर्म-कर्तव्य करताना त्यातला भगवंत दिसला की, संसाराचा स्वर्ग होतो.

तैसे ऐहिकींचे का स्वर्गिचे| भोग पाईक जालिया इच्छेचे|

परि भोगावे हे न रूचे | मनामाजी ॥

“भोग” इच्छेचे पायीक (नोकर) झाले तरी तरी भोगावेत असे मनाला वाटत नाही. स्वर्गीचं ऐश्वर्य पायी लोटांगण घालायला लागले तरी त्याची अभिलाषा उत्पन्न होत नाही, अशी महान संतत्वाची वृत्ती “अलोलुप्त” याच अवस्थेत निर्माण होते. अष्टमहासिद्धीसह प्रत्यक्ष लक्ष्मी जरी जवळ आली तरी देखील महाविष्णू तिकडे लक्ष देत नाही, अशी अवस्था - संपूर्ण वैराग्य.

अपैशुन, दया आणि अलोलुप्त या तीन सद्गुणानंतर माऊली पुढचा अत्यंत प्रेमाने ओथंबून वाहणारा सद्गुण सांगतात-

4) मार्दव :- निसर्गातील “भूतमात्रांशी“ नि:स्वार्थ प्रेमाने आचरण करणे यास “मार्दव” संबोधले जाते. मार्दवाबाबत माऊली स्पर्शास मऊ, रुचीसंपन्न, सुगंधी, स्वच्छ, शुभ्र कापूर, मातृत्व, मलयगीरीचा शीतल वारा, या उपमांचा वापर करत त्याविषयी सहृदय व्यक्त होतात.

परि महाभूतें पोटरी वाहे | तेविची परमाणुमाजी समायें|

या विधानुसार होय| गगन जैसे॥

अथांग, अफाट, अगणित, अनंत पसरलेले आकाश जसे अखंड “ब्रह्मांडास” कवेत घेण्याची ताकद ठेवते आणि अगदी अणु-रेणूमध्येही त्याचे अस्तित्व असते. तसाच मार्दव हा सद्गुण सर्व विश्वावर वात्सल्याने प्रेमवर्षाव करणारा !!! - रामकृष्ण हरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT