Hind Di Chadar Pudhari
मुंबई

Hind Di Chadar: गुरु तेग बहादूरांच्या शहादतीचा संदेश मानवतेसाठी प्रेरणादायी – अमित शहा

नवी मुंबईतील 350 व्या शहिदी समागमात सहभाग; बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर साहिबजींचे नाव जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : ‌‘हिंद दी चादर‌’ म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे शहीदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी नवी मुंबईत केले.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे ‌‘हिंद दी चादर‌’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना अमित शहा म्हणाले, प्रत्येक गुरुद्वारा आणि प्रत्येक वस्तीपर्यंत ‌‘हिंद दी चादर‌’चा संदेश पोहोचविण्यासाठी बाबा हरनाम सिंगजी यांनी मोठे कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समाजासाठी सेवाकार्याची संधी साधत विविध प्रसंगी त्यांच्या परंपरा, श्रद्धा आणि योगदानाचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर देशभर ‌‘हिंद दी चादर‌’ पर्वाचे आयोजन करण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

यावेळी संत परंपरेचे स्मरण करताना अमित शहा यांनी पोहरादेवी येथील सेवालाल महाराज तसेच संत नामदेव महाराज यांना वंदन केले. संत नामदेव यांच्या रचनांचा समावेश गुरू ग्रंथ साहिबमध्ये झालेला आहे, ही भारतीय संतपरंपरेच्या व्यापकतेची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत रविदास यांसारख्या संतांच्या विचारांनाही गुरू ग्रंथ साहेबमध्ये स्थान मिळाले आहे, यावरून भारतीय अध्यात्माची सर्वसमावेशकता स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

नववे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी अन्याय आणि अत्याचारांविरोधात उभे राहून त्यांनी दिलेले शहिदत्व भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. “शीश दिया, पर सिर न झुकाया” हीच शीख गुरुपरंपरेची ओळख असून भारताच्या अखंडतेचा तो आधार आहे. असे अमित शहा म्हणाले.

शीख परंपरेतील नामजप, आराधना आणि लंगर यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, या मूल्यांमधून समाजातील समरसता आणि बंधुभाव दृढ होतो. गुरू गोविंद सिंग यांच्या काळात खालसा पंथाची स्थापना झाली आणि धर्मरक्षणासाठी अद्वितीय त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली. त्यांच्या चारही सुपुत्रांच्या शहादतीनेही या परंपरेला अमरत्व प्राप्त झाले, असे त्यांनी नमूद केले.

आनंदपूर साहिबसारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले की, नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमाचा संदेश महाराष्ट्र शासन राज्यातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत पोहोचवत आहे, याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

स्वातंत्र्यानंतरही देशाच्या सुरक्षेसाठी शीख जवानांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यक्रमांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंग जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शहा यांना जफरनामा देऊन सत्कार करण्यात आला.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजला गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या नावाची घोषणा

नवी मुंबई : आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने बेलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजला शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी ‌‘हिंद दी चादर‌’ या कार्यक्रमामध्ये केली.

सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धिमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. हे लक्षात घेऊन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईची वाढती लोकसंख्या व इतर गोष्टींचा सारासार विचार करून 5-6 वर्षांपासून नवी मुंबई परिसरात नवी मुंबई महापालिकेचे हक्काचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज असावे, याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार, सिडको व न.मुं.म.पा प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्याला आज यश मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT