मुंबई : चंदन शिरवाळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होमपीच समजल्या जाणाऱ्या पुणे- पिंपरीतच त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित असलेल्या इतर महापालिकांमधील उमेदवार त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते.
पुणे आणि शेजारच्या पिंपरी- चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आपले होमपीच शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील दौरा वगळता अजित पवार यांनी या दोन्ही महानगरपालिकांमध्ये तळ ठोकला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पाच दिवसांपैकी केवळ 9 जानेवारी रोजी मिरज, लातूर, परभणी आणि अमरावतीमध्ये धावता दौरा केला आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे हेसुद्धा प्रचारात तुरळक दिसत असल्याची खंत उमेदवार व्यक्त करत आहेत.
महापालिकांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 40 स्टार प्रचारक नियुक्त केले होते, परंतु तेसुद्धा अजित पवार यांच्याप्रमाणे आप-आपल्या महानगरपालिकांच्या हद्दीतच मर्यादित राहिले आहेत. पक्षाचा राज्यव्यापी प्रचार होत नसल्यामुळे पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
6 जानेवारी रोजी त्यांनी पिंपरी- चिंचवड मनपा प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 21, 22 आणि 27 मध्ये निवडणूक प्रचारसभा घेतल्या.
7 जानेवारी रोजी पुण्यातील कुसाळकर पुतळा चौक- जंगली महाराज रोड - दत्तवाडी - दशभूजा गणपती चौक येथे प्रचार रॅली सायं.6 वाजता काशेवाडी, नरपतगिरी चौक, रास्ता पेठ,वडारवाडी येथे सभा, तर रात्री 8 वाजता हॉटेल सेंट्रल पार्क येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला. त्यानंतर मनपा प्रभाग क्र.7,8,12 मध्ये निवडणूक प्रचारसभा घेतली.
8 जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड म.न.पा. प्रभाग क्र. 23 मध्ये पदयात्रा व कोपरासभा, प्रभाग क्र. 11, 32, 19, 18, 14 व 15 मध्ये निवडणूक प्रचारसभा घेतल्या.
10 जानेवारी रोजी शिवाजीनगर येथे पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक जाहीरनामा प्रकाशन, त्यानंतर प्रभाग क्रमांक 20,21,36, 37,38,39 ,40 मध्ये रोड शो, दुपारी 3 वाजता मार्केट यार्डमध्ये व्यापारी मेळावा, सायं.4.30 वाजता तालेरा गार्डनमध्ये रिक्षाचालक, कॅबचालक मेळाव्यापाठोपाठ म.न.पा.प्रभाग क्र.20,21, 30,32, 33,36 व 37 प्रचारसभा, तर बावधन ते भुसारी मार्ग रोड शो घेतला.