

मुंबई : येथील गोरेगाव परिसरातील एका घरात शुक्रवारी मध्यरात्री फ्रिजचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत वडिलांसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
पावसकर कुटुंब गाढ झोपेत असताना फ्रिजचा मोठा स्फोट होऊन आग लागली. काही क्षणातच ती घरभर पसरली. त्यामुळे संजोग पावसकर (वडील) आणि त्यांची दोन मुले हर्षदा पावसकर (वय 19) व कुशल पावसकर (12) यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. तिघेही होरपळून मरण पावले. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी मुलांनी शेवटपर्यंत धडपड केल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने आई बचावली
या दुर्घटनेत सुदैवाने मुलांची आई बचावली. ती रात्रपाळीच्या कामावर गेल्यामुळे त्यावेळी घरी उपस्थित नव्हती. त्यामुळे ती या आगीतून वाचली असली, तरी एका रात्रीत आपले पती आणि दोन अपत्ये गमावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.