नवी मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या ऐरोली-कटाई उन्नत मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. उन्नत मार्गाच्या दोन्ही टप्प्यातील 80 ते 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नव्या वर्षात हा फ्री-वे प्रवासासाठी सेवेत येणार आहे.
ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी पारसिक डोंगरातून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. मे 2018 मध्ये ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा 3.43 किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
कोरोनाचा कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबरच सिडको आणि वनविभाग, सीआरझेड झोन परवानगी, रेल्वे ट्रॅकमुळे गर्डर टाकण्यास थांबलेली परवानगी, महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकणे, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. सात वर्षांनंतर 2026 मध्ये अर्थात नवीन वर्षात या फ्री-वेवरुन मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सन 2026 मध्ये ऐरोली-काटई मार्ग खुला होणार आहे. हा मार्ग खुला झाल्यानंतर ऐरोली येथील जड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबईवरून ही वाहने थेट कल्याणकडे या उन्नत मार्गावरून पुढे जातील त्याचप्रमाणे कल्याणकडून येणारी वाहने थेट मुंबईत पुढे मार्गस्थ होतील. महापे आणि शिळफाटा येथील वाहतूक कोंडी देखील कमी होईल तसेच या ठिकाणी होणारे अपघात टळतील.
ऐरोली-काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागला गेला असून भाग-1 अंतर्गतचा रस्ता हा ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे. या भागाची लांबी 3.4 कि.मी. इतकी असून त्यामध्ये 1.69 कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित रस्ता व उन्नत मार्ग आहे. तर या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार 4-4 मार्गिकेचा आहे. ऐरोली ते ठाणे बेलापूर मार्ग, ठाणे-बेलापूर ते मुंब्रा बायपास आणि मुंब्रा बायपास ते कल्याण-काटई असा बारा किलोमीटरचा प्रत्येकी तीन मार्गिका असलेला हा रस्ता आहे. मुंबईच्या फ्री वेच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल असा हा उन्नत मार्ग असणार आहे.