

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील मतदारांची संख्या निश्चित झाली असून यावेळी 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 10 हजार 231 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून ही मतदान केंद्रे शाळा, महाविद्यालयांसह शासकीय, निमशासकीय इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच खासगी इमारतींमध्ये असणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व तरतुदींचे पालन करून तयार केलेली 227 प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र कोणते, याची आधीच खात्री करून घ्यावी. मतदान प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि मतदारांना सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
मतदारांना मतदान करण्यासाठी सात परिमंडळांतील 24 प्रशासकीय विभाग कार्यालयानुसार तसेच 23 मध्यवर्ती मतदान केंद्रांनुसार 10 हजार 231 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक मतदार सहाय्य केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. केंद्रांवर माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आली असल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
मुंबई शहर व उपनगरात उभारण्यात येणाऱ्या 10 हजार 231 मतदान केंद्रांपैकी 4 हजार 386 मतदान केंद्रे शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये 2 हजार 387 मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, 880 मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर 1 हजार 119 मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये 702 मतदान केंद्रांची व्यवस्था आहे.181 मतदान केंद्रे बंदिस्त, 312 मतदान केंद्रे अर्धबंदिस्त तर 209 मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये आहेत. तर खासगी इमारतींमध्ये 5 हजार 143 मतदान केंद्रे असून यामध्ये 2 हजार 710 मतदान केंद्रे बंदिस्त आहेत. 1 हजार 378 मतदान केंद्रे अर्धबंदिस्त तसेच 1 हजार 55 मतदान केंद्रे खुल्या जागेमध्ये असणार आहेत.