कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके. Pudhari
मुंबई

Abhijit Dipke : "मी रस्त्यावर पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन..." ; अभिजीत दिपकेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत 'सीजेपी'चे आंदोलन सुरूच राहणार

पुढारी वृत्तसेवा

Abhijit Dipke CJP protest Mumbai :

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना मतदानाचा अधिकार दिला; पण आज काय सुरू आहे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलन केले तर तीन दिवसांनंतर जामीन मिळेल, असे म्हटले आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, तीन दिवस नाही, तीन महिने जेलमध्ये टाका तरी चालेल! तीन महिने जरी जेलमध्ये टाकले ना, तरी मी रस्त्यावर पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन," अशा शब्दांमध्ये कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज (दि. १) मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. शुक्रवार, २ ऑक्टोबरपासून कॉकरोज जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दीपके म्हणाले की, "लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र यानंतर २०२४ ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र कसं काय बदललं? काय बदललं म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनाला सुरुवात करत आहोत. कारण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा."

महात्मा गांधींना कधी ब्रिटिशांनी परवानगी दिली होती का?

आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच आंदोलन करतोय, तुम्हाला वाटतं का सरकार आम्हाला आंदोलनासाठी परवानगी देईल? महात्मा गांधींना कधी ब्रिटिशांनी परवानगी दिली होती का? तरीही आंदोलन करावं लागलं, कारण देश महत्त्वाचा होता. आंदोलनाला परवानगी नाकारणे ही सरकारची भीती आहे. त्यांना कळून आलेलं आहे देश नाराज आहे आणि देश आता शांत बसणार नाही; त्यामुळे ते धमक्या देत आहेत की आंदोलन केलं तर काय तीन दिवसांनी जामिनावर सुटका होईल, असा दावाही दीपके यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे

देशातील जनतेचा विश्वास निवडणूक आयोगावर राहिलेला नाही. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच यानंतर नियुक्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांची नियुक्तीही अत्यंत पारदर्शीपणे व्हायला हवी. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झाला नाही तर संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल. याआधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला; पण त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाहीतर प्रधानांच्या प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी झाली, पुन्हा तशीच मागणी होईल.

आंदोलनात गांधीजींचा टी-शर्ट घालून यावे

उद्या येताना सर्वांनी गांधीजींचे टी-शर्ट घालून यावे आणि हातामध्ये तिरंगा घेऊन आंदोलनासाठी यावं, असे आवाहन करत आमच्या कोणत्याही आंदोलनाला आजपर्यंत परवानगी दिलेली नाही. पण आम्ही लोकशाहीला मानतो, संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, कायदा आमच्या बाजूने आहे. जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, मग ते आम्हाला परवानगी देतील का? असा सवालही दीपके यांनी केला.

शिवसेनेच्या चार तारखेला होणाऱ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल

शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री रॅली करू शकतात तर आम्ही आंदोलन का करू शकत नाही? मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा कायदा आणि सामान्य नागरिकांसाठी वेगळा कायदा आहे का? सर्व पक्षांनी बसून एकदा ठरवावं की आम्ही कोणत्या पक्षाची बी टीम आहोत. शिवसेनेच्या चार तारखेला होणाऱ्या आंदोलनाला देखील आमचा पाठिंबा असेल, असेही दीपके यांनी यावेळी जाहीर केले.

केसेस होण्याची भीती लोकांच्या मनामधून गेली आहे

आंदोलन करण्याबाबत लोकांच्या मनामध्ये अजिबात भीती नाही. केसेस होण्याची भीती लोकांच्या मनामधून निघून गेली आहे. अमित शाह यांनी जी चूक केली होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. आंदोलन मोठे करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अटक करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

शिक्षण आणि बेरोजगारी दोन महत्त्वाचे मुद्दे

शिक्षण आणि बेरोजगारी हे आमचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. आमच्याकडे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत पण सीजेपी त्यांच्या प्रश्नासाठी लढायला तयार आहे. देशात काहीतरी नवीन करण्यासाठी सीजेपी लढायला तयार आहे. सर्व लोक आमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. लोकांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण आम्ही काही बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही दीपके म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT