मराठवाडा

शिल्लक उसाने नामदेवांचे आयुष्य केले ‘कडू’; शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अविनाश सुतार

बीड; गजानन चौकटे : बुधवार (दि.११) रोजी गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस कारखान्याकडे जात नसल्याने उसाला आग लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून जाधव कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने घर उघड्यावर पडले आहे. या आत्महत्येनंतर 'संकटातील बळीराजाचा वाली कोण' हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून राज्यभरातून पुढाऱ्यांना व प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.

राज्यात 36 वर्षांपूर्वी, 19 मार्च 1986 रोजी शेतकरी आत्महत्येची पहिली नोंद झाली. त्यानंतर राज्यभरातील तब्बल ४० हजार शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव गळफास लावून जीवन संपविले. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी, नापिकी, विविध रोग अशा सर्व संकटातूनही जगाचा पोशिंदा ताठ मानेने उभारण्याचा प्रयत्न करतोय. रात्रंदिवस जागून, अंधारात कशाचीही भीती न बाळगता कुटुंबातील सर्वजण झोपी गेल्यानंतर स्वत: एकटाच शेतात जाऊन पिकाची जपणूक करतोय. मनातील दु:ख तो ओठावर कधीही आणत नाही. वर्षातील एकतरी दिवस आपल्यासाठी चांगला येईल, अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्याला 365 दिवस संकटाशी मुकाबलाच करावा लागत असल्याची स्थिती आहे.

सण-उत्सवात मुलाला नवीन कपडे, काहीतरी नवीन पदार्थ करून खाण्यासाठी त्याला शेती पिकाच्या उत्पन्नाची वाट पाहावी लागते ही वस्तुस्थिती आहे. हमीभावासाठी अनेक वर्षे संघर्ष करूनही त्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. तरीही, जो काही भाव येईल, त्यातही समाधान मानणारा शेतकरी आता स्वत:च्या तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला ऊस कारखान्याला घालविण्यासाठी संघर्ष करतोय. दुसरीकडे महावितरणकडून वीज तोडणी सुरु असतानाच त्या अधिकाऱ्यांना ऊस शेतात तसाच उभा असून बिल आल्यावर वीजेची थकबाकी भरतो, अशी विनवणी करू लागला आहे. तरीही, त्यांचे कनेक्‍शन तोडले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा कळवळा आणून मोठमोठ्या बाता मारणाऱ्या पुढाऱ्यानेही त्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे.

संकटातील बळीराजाचा वाली कोण? सध्या शेतात उभा असलेला ऊस तुटून कारखान्याला गेल्यानंतर पुढच्यावेळी लवकर कारखान्याला ऊस जाईल आणि चार पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा असते. पण, सध्याचा ऊस 20 महिने होऊनही कारखानदार घेऊन जात नसल्याने त्याला भविष्याची चिंता सतावू लागली आहे. जगावे की मरावे, अशा स्थितीतील शेतकऱ्यांबद्दल जिल्हा प्रशासनदेखील गंभीर नाही, हे विशेष. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या दु:खाची जाणीव असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशा बाता मारणारे अधिकारीदेखील शेतकरी प्रश्‍नांवर गंभीर नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा ऊस तत्काळ तोडून न्यावा,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठकदेखील घेतलेली नाही. शेतातील तुरा आलेला ऊस लवकर घेऊन जावा, यासाठी अनेक शेतकरी चित्ताग्रस्त असतो कारखान्यात जाऊन पायपीट करत असतो परंतु उपयोग होत नाही आणि याच नैराश्यातून संपूर्ण मराठवाड्यात हादरून टाकणारी विदारक बुधवारी गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली.

आयुष्यात अनेक अडचणींवर मात करत आपण आलेला आहात आत्महत्या हा पर्याय नाही आपण संयम राखावा असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT