वाशिम : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू आणि मोठ्या मेव्हणीचा कोयत्याने मुडदा पाडला | पुढारी

वाशिम : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू आणि मोठ्या मेव्हणीचा कोयत्याने मुडदा पाडला

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजारमध्ये जावयाने सासू आणि मोठ्या मेहुणीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघीही ठार झाल्या. ही घटना आज (दि. १३) सकाळी ११ च्या सुमारास घडली. सचिन धर्मराज थोरात असे आरोपी जावयाचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेलुबाजारमधील वार्ड क्र. २ मध्ये निर्मला पवार राहतात. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी विजया गुंजावळे ही जिंतूर (जि. परभणी) येथील रहिवासी असून आईला भेटण्यासाठी ती शेलुबाजार येथे आली होती. तर लहान मुलीचा सचिन थोरात हा पती आहे. सचिन हा पुण्यात कामानिमित्त राहतो, तो आज सकाळीच पुण्याहून शेलुला आला व थेट सासूच्या घरी जाऊन सोबत आणलेल्या सुरीने सासू निर्मला आणि मेहुणी विजया यांच्यावर वार केले. यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी सचिन पळून जात असताना पोलीस शिपाई ज्ञानेश्वर राठोड, गोपाल कव्हर, संदीप खडसे यांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button