परंडा; पुढारी वृत्तसेवा: माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी चार अपत्ये असल्याचा उल्लेख शपथपत्रात केला नाही. ही बाब हेरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तक्रार केली होती. त्यावर सुनावणी होऊन विभागीय सहनिबंधक यांनी माजी आमदार पाटील यांना संचालक पदावरून अपात्र ठरविले होते. यानंतर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी 'सावंतांच्या पैशाचा अन् सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे जोरदार प्रत्युत्तर सावंत यांना दिले आहे.
आज (दि, ५) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की, जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचे नोटीस पाठवून आजारपणात त्रास देणाऱ्या सावंतांच्या पैशाचा अन् सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला थोडी लाज असेल,तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जा. मग जनता ठरवेल त्यांना कोणता नेता पाहिजे. ते आम्ही मान्य करु, असे आवाहन पाटील यांनी सावंत यांना दिले आहे.
ज्यांना बोटाला धरून जिल्ह्याचे राजकारण शिकवलं, राजकारणात संधी दिली त्यांनीच माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन रुग्णालयातील आय.सी.यु. मध्ये असताना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची नोटीस पाठवून त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. विभागीय सहनिबंधक कार्यालयात दि. ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली असताना, दि.१० फेब्रुवारी रोजी नोटीस प्राप्त झाली. या कालावधीत मी दि. ११ फेब्रुवारी पर्यंत रुग्णालयात आय.सी.यु. मध्ये होतो. सावंत यांनी कपटी राजकारण केले व विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योती लाटकर यांनी नोटीसला उत्तर देण्याची संधी मला दिली नाही, असेही माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.
सावंत यांनी कपटीपणाने रचलेला डाव तालुक्यातील जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या आर्शीवादाने माझी प्रकृती ठणठणीत आहे. सावंतांच्या खांद्यावर गुलाल टाकण्याचं पहिलं काम मी केले होते. त्यासाठी स्वतः च्या भावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी न देता धनंजय सावंत यांना दिली. निवडून आणलं आणि जिल्हा परिषदेत सभापती केले. त्यावेळी डॉ. तानाजी सावंत आमदारही नव्हते, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना आणला. सावंताना आलेल्या सगळ्या अडचणी सोडविण्यासाठी अनेकांचा विरोध पत्करून पुढाकार घेतला. ज्यांना हाताला धरून उभे केले, त्यांनी आपल्याला त्रास देण्याची भूमिका घेतली. तसेच सावंत यांनी मला व माझ्या कुटुबियांना त्रास देण्याच्या दृष्टीने शासकीय कर्मचाऱ्यावर दबाव टाकून तथ्यहीन प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात माझ्यासह मुलांवर खोट्या केसेस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ता येत असते जात असते पण सत्तेचा माज येवू द्यायचा नसतो. सावंताना आलेला पैश्याचा अन् सत्तेचा माज थोड्याच दिवसात जनता उतरवेल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख गौतम लटके, रणजित पाटील, जनार्धन मेहेर, शिवाजी कदम, रईस मुजावर आदी उपस्थित होते.