मराठवाडा

पैठण तालुक्यातील प्रियंका बसणार कोण होणार करोडपतीच्या हॉटसीटवर!

backup backup

पैठण, दादासाहेब गलांडे 

अनेक भाग्यवंतांच नशीब कोण होणार करोडपतीमुळे बदलले. आठवडी बाजारात किराणा माल विकणार्‍या पैठण तालुक्यातील छोट्याशा गावातील धनगाव येथील दुकानदाराची मुलगी प्रियंका ज्ञानेश्वर महाले हिने देखील या शोच्या माध्यमातून आपले व आपल्या कुटुंबाचे नशीब बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगले. तिचा हा जिद्दीचा व स्वप्नांचा प्रवास साकार होत आहे. एका मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपतीच्या हॉटसीटपर्यंत जाण्याचा बहुमान तिने मिळवला. ती लखपती होणार की करोडपती याची प्रतीक्षा आता सर्वांनाच आहे.

ग्रामीण भागात देखील लखलखणारा हिरा असतो हे तिने आपल्या जिद्दीतून, अभ्यासातून दाखवून दिले. आई, वडील, एक भाऊ व प्रियंका असे तिचे कुटुंब आहे. आठवडी बाजारात किराणा माल विकणार्‍या वडिलांचे छोटेसे दुकान आहे. कुटुंबाची हलाकीची परिस्थिती सुधारावी, कुटुंबाला चांगले दिवस यावे यासाठी वडील करत असलेले कष्ट ती लहानपणापासूनच पाहात आली. वडिलांचे हालहपेष्टा थांबवण्यासाठी काय करता येईल हाच विचार तिच्या मनात सतत होता. कोण होणार करोडपतीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करता येईल हे लक्षात आल्यावर तिने तयारी सुरू केली. यात दोन वेळेस अपयश आले तरी मनाने खचली नाही.

तेवढ्याच जिद्दीने अभ्यासात सातत्या ठेवले. या तिच्या प्रयत्नांना कमालीचे यश आले.प्रियंका सात टप्पे पार करत हॉटसीटपर्यंत पोहचली आहे. मात्र येथपर्यंत पोहचणे देखील सोपे नव्हते. हॉटसीटवर जाण्यासाठी अनेक टप्पे पार करावे लागतात. प्रत्येक टप्प्यात अपयशाची भीती कारण या स्पर्धेसाठी देशभरातून तब्बल ४९ लाख स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . मात्र यापैकी १२० जणांची निवड झाली होती. यातून फक्‍त ५० ते ६० स्पर्धकांना हॉट सीटवर जाता येते.

६ जून पासून कोण होणार करोडपती हा कार्यक्रम सुरू होणार असून प्रियंका लखपती होणार की करोडपती हे त्याचवेळी स्पष्ट होईल. या यशाबद्दल रोहयोमंत्री संदीपान भुमरे, पंचायत समितीचे माजी सदस्य बबनअण्णा बोबडे, सरपंच बापूसाहेब कातबणे, उपसरपंच योगेश बोबडे यांनी तिचे अभिनंदन केले.

क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न

प्रियंका महालेचे प्राथमिक शिक्षण पैठणच्या आर्यचाणक्य विद्यामंदिर येथे झाले .प्रतिष्ठान महाविद्यालयातून बीकॉमची पदवी मिळवली. एम कॉम यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून सुरू आहे. प्रियंका स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास सुरू आहे. प्रयत्न केले तर यश हमखास मिळते हाच तिचा मंत्र आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT