परभणी

परभणी: ‘दै. पुढारी’च्या बातमीचा इफेक्ट; पांगरा येथे पशूधनास लसीकरण

अविनाश सुतार

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यात जनावरांच्या तोंडातील लाळ खुरकूत संसर्गजन्य रोगाचा प्रार्दूभाव झाला आहे. याबाबतची  बातमी 'दैनिक पुढारी'च्या दि. ३ फेब्रुवारी २०२४ च्या अंकात "पूर्णा तालुक्यात पशूधनास लाळ खुरकूत रोगाचा प्रार्दूभाव" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची गंभीर दखल घेत पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी तत्काळ लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या.

चुडावा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी कृष्णा तालेवार, बापूराव कल्याणकर, संतोष कुलकर्णी यांनी पशूधन विकास अधिकारी डॉ. राजीव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरा लासीना येथे आज (दि.१०) तोंडखुरी रोगग्रस्त जनावरांवर उपचार केले. तर जनावरांना लाळखुरकूत प्रतिबंधक एफएमडी लसीकरण केले.

जनावरांच्या तोंडातील लाळ आणि पायाच्या खुरातील खुरी रोगाच्या विषाणूंचा प्रादूर्भाव लाळ, शेणातून व चाऱ्यांतून जनावरांना होतो. या रोगाचा फैलाव हा अधिक करुन हिवाळ्याच्या दिवसात होतो. त्यामुळे लसीकरण करणे अत्यावशक असताना शासकीय पशुधन विकास अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे लसीकरण झाले नव्हते. त्यामुळे अनेक जनावरे या रोगास बळी पडले.

परिणामी, शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करावे लागल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. पांगरा येथील बालाजी केशव‌ ढोणे यांची मोठी गाय दगावली. चुडावा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. कसबे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्यामुळे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, 'दै. पुढारी' च्या बातमीमुळे पशुसंवर्धन खाते गडबडून जागे होऊन कामाला लागल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT