परभणी: मानवत येथील बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप | पुढारी

परभणी: मानवत येथील बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप

डॉ. सचिन चिद्रवार

मानवत: स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था मानवत व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहाव्या विभागीय बालकुमार साहित्य संमेलनात निमंत्रितांचे कविसंमेलन व कथाकथन चांगलेच रंगले. आज (दि.७) शेवटच्या सत्रात झालेला सांस्कृतिक कार्यक्रमानंतर संमेलनाचे सूप वाजले.

शहरातील नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. ६) सकाळी ग्रंथदिंडी, शोभायात्रा व उद्घाटन समारंभानंतर दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन व कथाकथन चांगलेच रंगले. या सत्रात कवींनी विशेषतः ग्रामीण, बाल, विनोदी साहित्यासह शाळा व आईवर बहारदार कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी महेश खरात होते. कविसंमेलनात अर्चना डावरे, अशोक कुबडे, योगीराज माने, नयन राजमाने, डॉ. संतोष देशमुख, तौसिफ शेख, महेश मोरे, शंकर राठोड, मंगेश पैंजने, भीमाशंकर तांदळे, मायादेवी गायकवाड, वीरभद्र मिरेवाड, कृष्णा भालेराव, बाबासाहेब सौदागर, राजनंदिनी निर्मळ, नामदेव कोद्रे व विठ्ठलतात्या संधान यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.

कथाकथन कार्यक्रमात माधव फुलारी, त्र्यंबक वडसकर, चंद्रशेखर कळसे व राम तरटे यांनी कथावाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनय्या कीर्तनकार, एकनाथ रापेल्लीवार यांनी सूत्रसंचालन, गंगाधर कंकाळ, तर आभार प्रदर्शन संजय पक्वाने यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाला अलोट गर्दी

संमेलनाचा समारोप व सांस्कृतिक कार्यक्रमास बालगोपालांसह तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये कुलस्वामिनी चित्रपट फेम अभिनेत्री व टीव्ही कलाकार श्वेता सुतार , धर्मवीर अभिनेता योगेश कुलकर्णी, मधुकर उमरीकर, उद्धव नाईक, डॉ. सुभाष कदम, शिवाजी मव्हाळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. अनंत गोलाईत उपस्थित होते. संमेलनात प्रा. अनंत गोलाईत यांच्या प्रतिबिंब या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात लड्डा विद्यालयाच्या चिमुकल्यांनी देवा श्री गणेशा या गाण्यावरील नृत्याने केली. सध्या अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर निर्मिती झाल्याची झलक या सांस्कृतिक कार्यक्रमात पण दिसून आली. खडकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लड्डा इंग्लिश स्कुल, जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवतरोड, नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालय व आपलं स्वरांगण ग्रुप या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी रामाच्या गीतावर नृत्य केल्याने वातावरण ‘ राम ‘ मय झाले होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमात तालुक्यातील एकूण २६ शाळा सामील झाल्या होत्या. कार्यक्रमाचा समारोप श्रीस्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राच्या बालकांनी वृद्धाश्रम मुक्त भारत काळाची गरज या हृदयस्पर्शी नाटिकेने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर तुपसागर, विलास मिटकरी, सुनीता झाडगावकार, आनंद नांदगावकर, सत्यशील धबडगे, सोनय्या कीर्तनकार यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button